न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत ठणठणाट
By Admin | Updated: May 9, 2015 03:42 IST2015-05-09T03:42:24+5:302015-05-09T03:42:24+5:30
सध्या प्रभाग क्र. ३७ मध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी गुरुवारी खोदकाम सुरू असताना येथील संकल्प सोसायटीजवळ

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत ठणठणाट
दिंडोशी : सध्या प्रभाग क्र. ३७ मध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी गुरुवारी खोदकाम सुरू असताना येथील संकल्प सोसायटीजवळ पाण्याची जलवाहिनी फुटली. त्यामुळे शुक्रवारी येथील न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पाण्याचा ठणठणाट झाला. परिसरातील सुमारे १० हजार नागरिकांचे हाल झाले. येथील अनेक सोसायट्यांना पाण्याचे टँकर मागवावे लागले. येथे क्र. १ ते २८ म्हाडाच्या इमारती आणि ९८ रो हाऊसेस आहेत.
प्रभाग क्र. ३७ चे माजी नगरसेवक सदाशिव पाटील आणि नगरसेविका मनीषा पाटील यांनी जलवाहिनी फुटल्याची घटना लक्षात येताच पालिकेच्या पी (उत्तर) विभागाच्या जलअभियंत्याशी संपर्क साधला. त्यानंतर आज पाणी येणार नसल्याची माहिती काल रात्री येथील म्हाडा सोसायट्यांना संपर्क साधून दिली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण झाले आहे. उद्या येथील म्हाडा वसाहतीला पाणी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून येथील म्हाडा वसाहतीला उद्या मध्यरात्री पाणी सोडण्यात येणार असून उद्या सकाळी येथील नागरिकांना पाणी मिळेल, अशी माहिती पालिकेच्या पी (उत्तर) विभागाचे उपजल अभियंता पिंगळे यांनी दिल्याची माहिती इमारत क्र.२०चे सुनील देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)