Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यू दिंडोशी गिरीकुंज सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर 'या' आठवड्यात दोन वेळा बिबट्याचा संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 14:38 IST

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू म्हाडा कॉलनी येथील न्यू दिंडोशी गिरीकृंज गृह संस्थेच्या संरक्षक भिंतीवर गेल्या रविवार ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता व बुधवार १४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता बिबट्या बसलेला येथील नागरिकांना आढळला

- मनोहर कुंभेजकरमुंबई- दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू म्हाडा कॉलनी येथील न्यू दिंडोशी गिरीकृंज गृह संस्थेच्या संरक्षक भिंतीवर गेल्या रविवार ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता व बुधवार १४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता बिबट्या बसलेला येथील नागरिकांना आढळला, यामुळे या परिसरात प्रचंड भीती पसरली असून आजूबाजूला खेळणारी लहान मुले तसेच रात्री जेवणानंतर शत पावली करणा-या लोकांवर बिबट्या हल्ला करू शकतो या भीतीने जनतेच्या मनात प्रक्षोभ निर्माण झाला आहे. मनुष्य वस्तीत वावरणारा हा बिबट्या नरभक्षक देखील होऊ शकेल आणि हे सर्व टाळण्याकरिता बिबटा मनुष्य वस्तीत येण्यापासून रोखण्याकरिता खबरदारीच्या उपाययोजना त्वरेने करणे आवश्यक झाले आहे.यापूर्वी 2017 रोजी न्यू म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 5 आणि इमारत क्रमांक 20,21च्या आवारात रात्री बिबट्या आला होता. न्यू म्हाडा कॉलनी परिसरात बिबट्याच्या वावर वाढल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. न्यू म्हाडा कॉलनीला लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने बिबट्या कधीही येथे येऊ शकतो, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू म्हाडा कॉलनी येथील, न्यू दिंडोशी गिरीकृंज गृह संस्थेच्या आवारातील मनुष्य वस्तीत संचार करणा-या या बिबट्याच्या संचारावर कायमस्वरुपी नियंत्रण करण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संबंधित अधिका-यांना तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, विभागप्रमुख, माजी महापौर सुनील प्रभू यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे केली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिव वने यांच्याकडून, मनुष्य वस्तीत संचार करणा-या बिबट्याच्या संचारावर कायमस्वरुपी नियंत्रण करण्याच्या उपाययोजना करून ४८ तासांत अहवाल मागविला असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतशी बोलताना दिली.