Join us

नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 02:17 IST

लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नववर्षात पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकात ‘पॉड हॉटेल’ प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. प्रवाशांना तात्पुरता वेळ राहण्याची सुविधा पॉड हॉटेलमुळे मिळेल.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने पॉड हॉटेलची निर्मिती केली जाणार आहे. पॉड हॉटेलसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. १८ डिसेंबरला निविदा उघडण्यात येतील. त्यानंतर, २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत पॉड हॉटेलची उभारणी केली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मार्च, २०२० पर्यंत पॉड हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आयआरसीटीसीकडून तयार करण्यात आले आहे.देशातील पहिले पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणार आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनचे पॉड हॉटेल बनविले जाणार आहे. प्रवाशांना येथे राहण्याची उत्तम सोय होणार आहे. या पॉडची सर्वप्रथम संकल्पना जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाºयांना तत्काळ झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली. देशात सर्वप्रथम अंधेरी येथे २०१७ साली खासगी पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे.

एकूण ४ हजार चौरस फुटांच्या जागेवर या पॉड हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असणार आहे. हवेशीर जागा, डिझाइन असलेल्या नक्षी, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. या रूममध्ये अनेक जीवनावश्यक गरजेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा मिळणार आहेत. प्रवाशांना कमाल १२ तासांची विश्रांती करता येणार आहे. आयआरसीटीसीकडून अशा २५ पॉड (रूम)ची उभारणी करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :भारतीय रेल्वेमुंबईलोकल