कुसुमाग्रजांच्या भूमीत उदयाला यावा साहित्य संमेलनाचा नवा उष:काल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:59+5:302021-02-05T04:23:59+5:30

स्वप्नील कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दरवर्षी भरणारा सारस्वतांचा कुंभमेळा यंदा २६ ते २८ मार्चदरम्यान कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नाशिक ...

New dawn of Sahitya Sammelan should emerge in the land of Kusumagraj! | कुसुमाग्रजांच्या भूमीत उदयाला यावा साहित्य संमेलनाचा नवा उष:काल!

कुसुमाग्रजांच्या भूमीत उदयाला यावा साहित्य संमेलनाचा नवा उष:काल!

स्वप्नील कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दरवर्षी भरणारा सारस्वतांचा कुंभमेळा यंदा २६ ते २८ मार्चदरम्यान कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीत भरत आहे. संमेलन आणि वादविवाद, चर्चा, असे समीकरण आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. असे असताना कोरोनानंतरच्या परिस्थितीत मार्च महिन्यात तीन दिवस चालणाऱ्या या ‘शारदोत्सवा’च्या सोहळ्यात वाद-विवाद, मान-अपमान या गोष्टींना तिलांजली देत साहित्याचा नवा उष:काल उदयाला येणे भविष्याच्या दृष्टीने हितावह ठरणार आहे.

साहित्य संमेलने अनेक वादग्रस्त प्रश्नांमुळे चर्चेत आली. काही संमेलने वेगवेगळ्या वादांनी ओळखली जातात. विभिन्न साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांच्या परस्परभेटी व्हाव्यात, रसिकांनाही त्यात सामावून घेता यावे, लेखक हा प्रकट वाचक आणि वाचक हा मूक लेखक न उरता प्रत्यक्षातही एकमेकांशी विचारांचे, भावनांचे आदानप्रदान करता यावे, या उद्देशाने साहित्य संमेलनांचा घाट घातला जातो. त्यामुळे मायबोलीचा बोलबाला महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता अ.भा. संमेलनांच्या रूपाने अगदी पंजाबातील घुमानपर्यंत विस्तारला गेला आहे.

दरवर्षी होणाऱ्या या संमेलनामुळे साहित्यात भर पडते. संमेलनामुळेच लेखक-वाचक संवाद घडून येतो. या संवादामुळे लेखकाला बळ मिळून त्याचे लेखन अधिक चांगले घडू शकते. हा ‘शारदोत्सव’ आहे. वाचकांचा उत्सव आहे. या संमेलनांना वाचक चांगली गर्दी करतात. शब्द आणि अर्थाचे सहअस्तित्व हे ज्याप्रमाणे साहित्यात अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे साहित्याचे हे संमेलन आहे, असे म्हणताना लेखक आणि वाचकांचा योग जुळणे अपेक्षित आहे.

वाद व्हावेत ‘बाद’

मराठी साहित्य संमेलन आणि त्यात वाद झाला नाही, असे संमेलन शोधून काढावे लागेल. साहित्य संमेलनात आवश्यक, अनावश्यक, असे सगळ्या प्रकारचे वाद होतात आणि हे वाद भांडणात कधी रूपांतरित झाले हे कळतसुद्धा नाही. आता कोरोना काळानंतर प्रथमच नाशिक येथे होणाऱ्या ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनात हे वाद कायमचे ‘बाद’ व्हावेत आणि साहित्य संमेलनाचा खराखुरा आनंद मिळावा, अशी अपेक्षा मराठी रसिक बाळगून आहेत.

त्यामुळे गाजली साहित्य संमेलने

गेल्या तीस वर्षांत साहित्य संमेलनाचे स्वरूप आमूलाग्र बदललेले आहे. याची कारणे बदललेल्या सामाजिक स्थितीत आहेत. संमेलनांना आज भव्यतेचे रूप प्राप्त झाले आहे. कोटीची उड्डाणे त्याने कधीच ओलांडली आहेत. मात्र, त्याचा पारंपरिक सांगाडा आहे तसाच आहे. भाषा, साहित्य संस्कृतीविषयी भरीव असे काही या संमेलनातून निष्पन्न झाले नाही. याउलट संमेलने इतर गोष्टींमुळे जशी गाजली तशी अध्यक्षीय कार‌कीर्दीमुळेही मोठ्या प्रमाणात गाजली.

लोगो आहे -

साहित्य संमेलन उपेक्षा आणि अपेक्षा भाग-१

Web Title: New dawn of Sahitya Sammelan should emerge in the land of Kusumagraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.