रोह्यात नवीन कालव्याला तडे
By Admin | Updated: August 12, 2014 23:56 IST2014-08-12T23:56:34+5:302014-08-12T23:56:34+5:30
कोलाड पाटबंधारे विभाग कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने दुरुस्तीची कामे होत असल्याने दिवसेंदिवस शेतीक्षेत्र कमी होत आहे.

रोह्यात नवीन कालव्याला तडे
रोहा : कोलाड पाटबंधारे विभाग कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने दुरुस्तीची कामे होत असल्याने दिवसेंदिवस शेतीक्षेत्र कमी होत आहे. यू आकाराच्या येथील कालव्याच्या काँक्रीटीकरणाचे काम घाईघाईने भर पावसात करण्यात आले. मात्र आता या कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याने शासनाचे करोड रुपये पाण्यात गेले आहेत.
यू आकाराचा कालवा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्राचा आहे. तो कोकणात राबवणे योग्य नाही. या कामात डोंगर उतारावरील पाण्याला मार्गच दिला गेलेला नव्हता. त्यामुळे हा कालवा चिखलाने भरेल आणि त्याला तडे जातील, ही भीती शेतकऱ्यांनी पूर्वीच व्यक्त केली होती. देवकान्हे बाहे पट्ट्यात अनेक ठिकाणी कालव्याला तडे गेल्याने शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेल्याने एकच संताप व्यक्त होत आहे.
कोलाड पाटबंधारे विभाग कालव्यात अनेक वर्षे पाणी नाही. कालव्याची संथ गतीने दुरुस्ती होत आहे. त्यात देवकान्हे खांब विभागात कामे बऱ्यापैकी झाली तर किल्ला लांढर नजीक कालव्यांची दुरुस्ती यावर्षीही सुरुच राहिल्याने पाणी सोडलेच नाही. असे असतानाच यू आकाराचे काँक्रीट टिकणार नाही, याची प्रचिती पहिल्याच पावसात आली. देवकान्हेनजीक कालव्याला तडे गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे वाशी लांढर कालवा बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे या कामाचे काय होणार असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
देवकान्हे विभाग मुख्यत: लाढर नजीक कालव्याला यू आकाराचे काँक्रीट बांधकाम करण्यात आले. डोंगराच्या उतारावरील कालव्याचे काँक्रीट टिकणार नाही. त्यातच फक्त दीड दोन फुटाचे काँक्रीट करण्यात आल्याने वरील मातीने कालवा पुन्हा भरणार ही भीतीही खरी ठरली तर बाहे नजीकच त्या काँक्रीट कालव्याला भला मोठा तडा गेला आहे. इतरत्र ठिकाणाचे काँक्र ीटही कमजोर आहे. याला जबाबदार कोण? ठेकेदार, लोकप्रतिनिधी की प्रशासन असा सवाल शेतकरीवर्गातून होत
आहे.
यू काँक्रीटीकरण कमी पावसाच्या पट्ट्यात चालेल, मुख्यत: रायगडात चालणार नाही. याबाबत ठेकेदार भापकर यांना विचारले असता, हो खरे आहे. पण कामाचे स्वरूप तसेच आहे. काम चांगले झाले आहे असे उत्तर त्यांनी दिले होते. आता हेच भापकर काय बोलतात? हा प्रकार कुणावर लोटतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर करोडो रुपयांचा निधी पाण्यात जाणार आहे. एवढे करूनही कालव्याला पाणी नव्हते. पावसानंतर तरी पाणी सुरळीत होईल का? याची शाश्वती नसल्याचे चित्र आहे. हा प्रशासन व ठेकेदाराचा प्रताप बघून शेतकरी अक्षरश: डोक्यावर हात मारत आहेत. (वार्ताहर)