नवा पूल बनला मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: August 18, 2014 01:45 IST2014-08-18T01:45:41+5:302014-08-18T01:45:41+5:30
सायन-पनवेल मार्गावरील शिरवणे येथील नवा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे.

नवा पूल बनला मृत्यूचा सापळा
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील शिरवणे येथील नवा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या सळ्या रस्त्यावर उघड्या पडलेल्या आहेत. डांबरीकरणातून बाहेर आलेल्या या सळ्यांमुळे भरधाव वाहनांच्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अवघ्या तीनच महिन्यांपूर्वी बांधलेला शिरवणे येथील पूल मृत्यूचा सापळा झाला आहे. सायन-पनवेल मार्गावरील हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच उभारला आहे. सदर पुलाच्या कामात ठेकेदाराकडून झालेल्या विलंबामुळे ऐन पावसाळ्यात घाईमध्ये पुलाचे काम उरकण्यात आले. त्यामुळे सायन - पनवेल हा संपूर्ण मार्ग काँक्रीटीकरण करायचा असतानाही पुलावर मात्र डांबरीकरण करण्यात आले. या कामातही निष्काळजीपणा झाल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले आहे. शिरवणे पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे तेथून जाणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच शिरवणे पुलावर रस्त्याच्या मधोमध टोकदार सळ्यांनी डोके वर काढले आहे. पावसामुळे पुलावरील रस्त्याचे सिमेंट व डांबर निघाल्याने बांधकामासाठी वापरलेल्या या सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना पुलावरुन वाहन चालवताना सावधानता बाळगावी लागत आहे.
सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण व नवा पूल झाल्याने या मार्गावरून जलदगतीने वाहने चालवली जात आहेत. अशा स्थितीत ह्या टोकदार सळ्यांमुळे टायर फुटून अपघाताची शक्यता तेथे निर्माण झाली आहे, तर मोटरसायकलस्वारांसमोर ह्या सळ्या मृत्यूचा सापळा बनून समोर उभ्या राहत आहेत. पावसाळ्यात पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून तात्पुरते प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यावेळी वापरण्यात आलेल्या खडी व सिमेंटमुळे सध्या या मार्गावर धुळीचे लोट उठत आहेत.
खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमेंट सुकल्याने त्याची
पावडर तयार झाली आहे.
त्यामुळे पुलावरुन भरधाव वाहने जाताच या सिमेंटची उडणारी धूळ दुचाकी वाहन चालकांच्या डोळ्यात जात आहे. अशावेळी डोळ्यात जाणाऱ्या धुळीपासून बचाव करीत रस्त्यावरील सळ्यांपासून देखील चालकांना वाहने सावरावी लागत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी शिरवणे पूल हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. मात्र संबंधित ठेकेदार अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचेही अद्याप त्याकडे लक्ष गेलेले नाही. (प्रतिनिधी)