नव्या बम्बार्डियरला मध्य रेल्वेचा नकार

By Admin | Updated: April 19, 2015 01:53 IST2015-04-19T01:53:49+5:302015-04-19T01:53:49+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या वाट्याला नव्या बम्बार्डियर लोकल आलेल्या असतानाच मध्य रेल्वे प्रवाशांच्या नशिबी मात्र या नवीन लोकल नसल्याचे समोर आले आहे.

New Bambardiar refuses Central Railway | नव्या बम्बार्डियरला मध्य रेल्वेचा नकार

नव्या बम्बार्डियरला मध्य रेल्वेचा नकार

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या वाट्याला नव्या बम्बार्डियर लोकल आलेल्या असतानाच मध्य रेल्वे प्रवाशांच्या नशिबी मात्र या नवीन लोकल नसल्याचे समोर आले आहे. देखभालीचा वाढणारा खर्च आणि चालन प्रक्रियेत अडथळा येण्याची कारणे देत मध्य रेल्वेवर बम्बार्डियर लोकल नको, अशी अजब मागणी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे करतानाच या सर्व लोकल पश्चिम रेल्वेला देण्यात याव्यात आणि त्याऐवजी पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या जुन्या सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला देण्यात याव्यात, अशी अजब मागणी केली. ही मागणी रेल्वे बोर्डाकडून मान्य करण्यात आली आहे.
एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)मार्फत एमयूटीपी-२ अंतर्गत चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) बम्बार्डियर लोकल बनविल्या जात आहेत. ७२ बम्बार्डियर लोकलपैकी दोन लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवाशांसाठी धावत असून, या लोकलसाठी प्रवाशांच्या प्रतिक्रियाही मागवण्यात येत आहेत. एकूण ७२ लोकलपैकी ३२ लोकल पश्चिम, तर ४0 लोकल मध्य रेल्वेच्या वाट्याला असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता या लोकलवरून मध्य रेल्वेने एक नवीनच वाद निर्माण केला आहे. मध्य रेल्वेला नव्या बम्बार्डियर लोकल नको, अशी मागणी मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे नुकतीच करण्यात आली होती.
सध्या मध्य रेल्वेमार्गावर रेट्रोफिटेड, भेल आणि सिमेन्स कंपनीच्या लोकल धावत असून, त्याच्यावर देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च हा अधिक होत नाही. तर मध्य रेल्वेवर चालन प्रक्रियाही व्यवस्थित असून, त्याचा समतोल राखला जात आहे. बम्बार्डियर लोकल आल्यास देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढू शकतो आणि सध्याच्या चालन प्रक्रियेतही अडथळा निर्माण होऊ शकतो. ही कारणे देत बम्बार्डियर लोकल ताफ्यात घेण्यास मध्य रेल्वेकडून नकार देण्यात आला आणि तशी मागणीही बोर्डाकडे केली.
आमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेला द्या आणि त्याऐवजी पश्चिम रेल्वेवर धावत असणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या लोकल देण्यात याव्यात, जेणेकरून मध्य रेल्वेवर चालन प्रक्रियेचा समतोल राखला तर जाईल; शिवाय खर्चही कमी येईल, अशी मागणी केल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून ती मंजूरही करण्यात आली.
याविषयी पश्चिम आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांना विचारले असता, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आणि ती मंजूरही झाली आहे. वाढणारा खर्च आणि चालन प्रक्रियेतील अडथळा पाहता ही मागणी करण्यात आली होती. आम्ही बम्बार्डियर लोकलऐवजी पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स लोकल मागितल्या आहेत. (प्रतिनिधी)

ही मागणी मान्य झाल्याने मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाट्याला पश्चिम रेल्वेवरील धावत असलेल्या ४0 जुन्या सिमेन्स लोकल येतील. त्यामुळे नव्या लोकलपासून मध्य रेल्वे प्रवासी वंचित राहतील.
पुढील आठवड्यापर्यंत
डीसी-एसी परावर्तनाला मंजुरी?
मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी ते ठाणेपर्यंत १,५00 डीसी ते २५000 एसी परावर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊनही नियमितपणे परावर्तन सुरू करण्यात आलेले नाही. रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पडून असून, त्याला पुढील आठवड्यापर्यंत मंजुरी मिळेल, अशी आशा रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी व्यक्त केली.

Web Title: New Bambardiar refuses Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.