मुंबई : पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल मंगळवारी रात्री विरार यार्डात दाखल झाली. आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.
या नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या १० ते १२ एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही नवीन एसी गाडी चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) तयार केली आहे. ही गाडी सध्या जलद किंवा धिम्या मार्गावर चालविण्याचा निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांच्या मागणीनंतर चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर मुंबई लोकलने दररोज सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी सुमारे ४.३१ टक्के प्रवासी एसी लोकलने प्रवास करतात.
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेला उपनगरीय रेल्वेच्या तिकीट विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे नव्या एसी गाड्यांमुळे सेवांसोबतच रेल्वेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.