मुंबई - झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमातील प्रत्येक एपिसोडला आवर्जुन पाहिलं जातं. या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येते. मात्र, नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या उपस्थितीत 'विजेता' चित्रपटासंदर्भात केलेल्या खास शोमुळे ही चला हवा होऊ द्या टीम अडचणीत येण्याची शक्यता आहे.
''चला हवा येऊ द्या सारख्या टुकार कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची विटंबना करण्यात आलेली आहे. आपल्या अतिशय खालावलेल्या विनोदासाठी ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या विकासासाठी, सामाजिक सुधारणांसाठी आपले आयुष्य घालवले अशा महापुरुषांची विटंबना करणे दुर्देवी आहे. झी मराठी वाहिनी आणि बालिश दिग्दर्शक निलेश साबळे यांचा जाहीर निषेध..!''
अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईची आम भाषा मराठी असल्याचं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत म्हटले होते. त्यावर, आक्षेप घेत मनसेनं संबंधित निर्माता आणि कलाकारांना जाब विचारला होता. त्यानंतर, संबंधित निर्मात आणि कलाकारांनी व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली आहे.