नेरूळ रेल्वे स्टेशनमध्ये मद्यपींचा धिंगाणा
By Admin | Updated: July 13, 2015 23:33 IST2015-07-13T23:33:04+5:302015-07-13T23:33:04+5:30
नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिम बाजूला वाईन शॉपबाहेर मद्यपान केले जात आहे. मद्यपींचा प्रवाशांना त्रास होत आहे. कारवाईची मागणी नवी मुंबई रेल्वे

नेरूळ रेल्वे स्टेशनमध्ये मद्यपींचा धिंगाणा
नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिम बाजूला वाईन शॉपबाहेर मद्यपान केले जात आहे. मद्यपींचा प्रवाशांना त्रास होत आहे. कारवाईची मागणी नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेयर असोसिएशनने केली आहे.
हार्बर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये नेरूळचाही समावेश होतो. नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरातील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वाराजवळच वाईन शॉप आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत या ठिकाणी उघड्यावर मद्यपान सुरू असते. शेजारी बेकायदा आॅर्केस्ट्रा सुरू असतो. या ठिकाणी रोज दारूपार्टी सुरू असल्यासारखेच वाटते. मद्यपींच्या शेरेबाजीमुळे महिला प्रवासी त्रस्त झाल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नाही. रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहे.
रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला अभ्युदय बँकेच्या वाईन शॉपबाहेरही उघड्यावर मद्यपान सुरू असते. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. रेल्वे स्टेशनमध्ये गर्दुल्ले, भुरटे चोर व इतरांचा वावर वाढला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी केली आहे.
शिष्टमंडळाने नेरूळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांना निवेदन दिले आहे. यावेळी हनमंतराव घाडगे-पाटील, संगीता घाडगे, भाई मांजरेकर, मधुकर साटले, आनंदसिंग सहभागी होते.