Join us

नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे होणार दुपदरीकरण , खासगीकरणाच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:32 IST

Neral-Matheran railway : नेरळ-माथेरानदरम्यान १९०७ मध्ये सुरू झालेली ही मिनी ट्रेन ११४ वर्षांची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाच्या फटक्यामुळे ती वारंवार बंद ठेवावी लागते आहे.

मुंबई/कर्जत : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे खासगीकरण करून तिचा विकास करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने तयार केला आहे. सध्या तोट्यात असलेल्या या मार्गाचे खासगीकरण करून तो नव्याने बांधून घेण्याची, त्याचे दुपदरीकरण करण्याची आणि मार्गालगत काही नवी पर्यटन केंद्रे उभारून उत्पन्नाचे साधन तयार करण्याची ही योजना आहे. मार्ग तयार झाल्यावर रेल्वे फक्त त्याच्या देखभालीची जबाबदारी पार पाडेल. मात्र खासगीकरणातून रेल्वेला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल.   नेरळ-माथेरानदरम्यान १९०७ मध्ये सुरू झालेली ही मिनी ट्रेन ११४ वर्षांची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाच्या फटक्यामुळे ती वारंवार बंद ठेवावी लागते आहे. सध्याही अमन लॉज ते माथेरानदरम्यान काही फेऱ्या होत आहेत. या रेल्वेमार्गाला प्रवाशांची पसंती असली, तरी पुरेशी देखभाल नसल्याने आणि मार्ग जुना झाल्याने वारंवार इंजिन, डबे घसरण्याच्या घटनाही घडल्या होत्या. आताही हा मार्ग सुरू करायचा असेल तर त्यासाठी गुंतवणूक करण्याची रेल्वेची तयारी नाही.

- या प्रस्तावावर सप्टेंबरमध्येच चर्चा झाली होती. सध्या रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट ॲथोरिटी (आरएलडीए) त्याचा अहवाल तयार करीत आहे. - या मार्गाचे खासगीकरण केले, तर त्यातून रेल्वेला कमाईचे साधन मिळेल, असा विश्वास ‘आरएलडीए’चे अध्यक्ष वेद प्रकाश यांनी व्यक्त केला.

चार मार्गांचा होणार विकास 'युनेस्को'ने आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाबरोबरच हिमाचल प्रदेशमधील कालका-सिमला, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी-दार्जिलिंग, तामिळनाडूमधील नीलगिरी मार्गाचेही खासगीकरण करण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :माथेरान