नेपाळी श्रमिक युनियन शिवसेनेच्या पाठीशी
By Admin | Updated: October 7, 2014 01:30 IST2014-10-07T01:30:07+5:302014-10-07T01:30:07+5:30
भारतात तब्बल सव्वाकोटी नेपाळी लोक आहेत. तर महाराष्ट्रातील नेपाळींची संख्या १२ ते १५ लाखांच्या घरात आहे.

नेपाळी श्रमिक युनियन शिवसेनेच्या पाठीशी
मुंबई : भारतात तब्बल सव्वाकोटी नेपाळी लोक आहेत. तर महाराष्ट्रातील नेपाळींची संख्या १२ ते १५ लाखांच्या घरात आहे. महायुती तुटल्यानंतर नेपाळी श्रमिक युनियनने शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे युनियनचे अखिल भारतीय अध्यक्ष राज ठाकूर ऊर्फ मास्टर थापा यांनी सांगितले आहे. नेपाळी समुदाय अनेक समस्यांशी सध्या झुंजत असून त्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे मास्टर थापा यांनी सांगितले.
महायुती तुटण्यासाठी भाजपाच जबाबदार असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराला नरेंद्र मोदी अनुपस्थित होते, तेव्हापासूनच युतीमध्ये विसंवाद वाढत जाऊन युती तुटल्याचे थापा यांनी सांगितले. त्याचबरोबर बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिल्याची सलदेखील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असल्याने त्यांनी युती तोडण्याचे आधीच ठरवून टाकल्याचा गौप्यस्फोटदेखील थापा यांनी केला.
नेपाळी नागरिकांना अनेक पिढ्यांपासून भारतात राहूनदेखील एनआरआय संबोधले जाते. त्यांना भारत-नेपाळ दरम्यान झालेला १९५० चा करार माहीत नसावा, असा टोला मास्टर थापा यांनी लगावला. दुहेरी नागरिकत्व कायद्याने चुकीचे आहे. पण ज्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले आहे, त्यांना दुजाभाव देऊ नका, असे आवाहन थापा यांनी केले. (प्रतिनिधी)