घरफोडीप्रकरणी नेपाळी टोळीला अटक
By Admin | Updated: December 10, 2015 02:01 IST2015-12-10T02:01:38+5:302015-12-10T02:01:38+5:30
करावे येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक शेखर तांडेल यांच्या घरी घरफोडीची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या घटनेत तांडेल यांच्या घरातील ८७ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता.

घरफोडीप्रकरणी नेपाळी टोळीला अटक
नवी मुंबई : करावे येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक शेखर तांडेल यांच्या घरी घरफोडीची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या घटनेत तांडेल यांच्या घरातील ८७ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता.
तांडेल हे सहकुटुंब महाबळेश्वर येथे फिरायला गेले असताना त्यांच्या करावे येथील राहत्या घरी घरफोडी झाली होती. पाच दिवसांनी ते घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. या प्रकारात चोरट्यांनी त्यांच्या घरातील ७० लाख रुपयांची रोख रक्कम तसेच १७ लाख रुपये किमतीचे ७० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्यानुसार या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उपआयुक्त शहाजी उमाप, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने कसून तपासाला सुरवात केली होती.
तांडेल यांच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला होता. यावरून तांडेल यांच्या घरातील रोख रकमेची माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच गुन्हा केल्याची शंका पोलिसांना होती. त्यानुसार लगतच्या परिसरात चौकशी सुरू असताना हाती आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली. राजेश सहा (२५), गणेश सहा (२८) व देवसिंग ठाकुरिया (३७) अशी त्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर तीन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे सर्व जण मूळ नेपाळचे असून करावे परिसरातील इमारतींमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. फरार रमेश सहा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून त्याने तांडेल राहत असलेल्या शेजारच्या इमारतीमध्ये यापूर्वी सुरक्षा रक्षकाची नोकरी केलेली आहे. यामुळे तांडेल यांच्या व्यवसायाची त्याला माहिती होती. तांडेल हे सहकुटुंब घराबाहेर गेल्याची माहिती प्रथम त्याला मिळालेली. यानुसार त्याने इतर पाच साथीदारांना एकत्र करून मध्यरात्रीच्या सुमारास त्याठिकाणी घरफोडी केली होती. (प्रतिनिधी)