Join us  

हुसैनी इमारत पाडताना शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती, तातडीनं रहिवाशांना काढण्यात आले बाहेर  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 12:53 PM

मुंबई, दि. 1 -  भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील कोसळलेल्या हुसैनी इमारती चे बचावकार्य पूर्ण झाले आहे. गुरुवारी ( 31 ...

मुंबई, दि. 1 -  भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील कोसळलेल्या हुसैनी इमारतीचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. गुरुवारी ( 31 ऑगस्ट ) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 117 वर्ष जुनी असलेली ही 6 मजली इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली.  दरम्यान, हुसैनी इमारतीचा काही भाग अद्यापही उभ्या अवस्थेत आहे. इमारतीचा हा भाग कोसळण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र या इमारतीला लागूनच असलेली दावरवाला या दुमजली इमारतीच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अर्धवट अवस्थेत उभ्या असलेल्या हुसैनी इमारतीचा भाग पाडताना दावरवालाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दावरवाला इमारतीमधील निवासी आणि व्यावसायिक गाळे खाली करण्यात आले आहेत. ही इमारतही धोकादायक असून ती एसबीयुटी प्रकल्पात पुर्नविकास यादीत तिचा समावेश करण्यात आला आहे.  महापालिकेच्या सी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जीवक घेगडमल यांनी सांगितले की, ''हुसैनीचा उरलेला भाग पाडण्याचे आदेश आहेत. मात्र पुर्नविकासात र्विकासात गेलेल्या दावरवाला इमारतीबाबत एसबीयुटीकडून किंवा म्हाडाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी त्या इमारतीला महापालिका हात लावणार नाही''.

दुर्घटनेत 33 जणांचा गेला बळीमुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला असून 17 जण जखमी झालेत. तर 46 जणांना ढिगा-यातून सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एनडीआरएफकडून बचावकार्य थांबवण्यात आले आहे. रात्रभर हेबचावकार्य सुरु होते.  सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एनडीआरएफनं दिली. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, ६० ते ७० लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने २०११मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बु-हाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. २०१६मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.

आक्रोश..भय.. शोध निवा-याचा!, मोहल्ल्यात शोककळादुर्घटना झाल्यानंतर क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. काही दिवसांपूर्वी जेथे ईदची तयारी उत्साहात सुरू होती तेथे क्षणार्धात शोककळा पसरली. ढिगा-याखाली अडकलेल्या आप्तांचा शोध सुरू झाला. मृतांच्या नातेवाइकांच्या आक्रोश, हुंदक्यांनी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. इमारत धोकादायक होती, पण ती खाली करायला अनेक कुटुंबे तयार नव्हती. जीव मुठीत घेऊन तेथेच राहत होती. अखेर प्रश्न निवाºयाचा होता. जे गेले त्यांच्या दु:खासोबतच आता बचावलेल्या

रहिवाशांना चिंता भेडसावत आहे ती हक्काच्या निवा-याची... !बोहरी समाजातर्फे शुक्रवारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भेंडी बाजार परिसरात बकरी ईद साजरी करण्यात येणार होती. मात्र बहुसंख्य बोहरी समाजाचे रहिवासी असलेल्या हुसैनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर गुरुवारी येथील बोहरी मोहल्ल्यासह भेंडी बाजार परिसरावर शोककळा पसरली. आजूबाजूच्या इमारतीही सुरक्षेच्या कारणास्तव रिकामी करण्यात आल्याने हक्काचा निवारा तर गेलाच आहे, शिवाय या दु:खद प्रसंगी ईद साजरी करायची कशी, असा प्रश्न आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्बानीसाठी बकरा आणण्यापासून मिठाई तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्याची तयारीही झाली होती. मात्र गुरुवारी काळाने येथील कुटुंबांवर घाला घातल्यानंतर ईदच्या उत्साहाची जागा आक्रोशाने घेतली असून, सर्वांना भय आणि चिंतेने घेरले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांसोबत जखमींसाठीही विभागातून दुवा मागितली जात आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. इतकेच नव्हे तर अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान, पोलीस, महापालिका कर्मचारी, स्थानिकांना विविध लोकांकडून चहा, बिस्किटे, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ईदच्या आदल्याच दिवशी झालेल्या या दुर्घटनेबाबत प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता.

टॅग्स :अपघातमुंबई महानगरपालिका