Join us  

नेहरू सेंटरमध्ये चार दिवस मोफत पाहायला मिळतील एक से एक संगीत नाटकं; रसिकांसाठी ठरणार पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:20 PM

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची फार मोठी परंपरा लाभली आहे. विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, गो. ब. देवल, कृष्णाजी खाडीलकर, राम गणेश गडकरी यांच्याकडून आलेला वारसा आजही जपला जात आहे. हाच संगीतमय वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नेहरू सेंटरमध्ये चार दिवसीय संगीत नाट्यमहोत्सव भरविण्यात आला आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

रसिकांना संगीत नाटक एकत्रितपणे पाहायला मिळावीत, यासाठी दरवर्षी नेहरू सेंटरमध्ये मराठी संगीत नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा २३ ते २६ ऑगस्ट या दरम्यान नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात ३१वा संगीत नाट्यमहोत्सव होणार आहे. यात दररोज सायंकाळी ६:३० वाजता एक अशी एकूण चार नाटके सादर केली जातील. ‘संगीत माउली’ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात होईल. मुंबई मराठी साहित्य संघ निर्मित हे नाटक प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केले असून, राम पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आहे. 

दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील खल्वायनचे ‘संगीत ऋणानुबंध’ हे डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेले व प्रदीप तेंडुलकर यांनी दिग्दर्शित केलेले नाटक पाहायला मिळेल. २५ ऑगस्टला ‘संगीत संत तुकाराम’ हे ओम नाट्यगंधाची निर्मिती असलेले ज्ञानेश महाराव यांचे नाटक होईल. बाबाजी राणे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन संतोष पवारने केले आहे. लेखक-दिग्दर्शक विलास सुर्वे यांच्या ‘संगीत तमसो मा ज्योतिर्गमय’ या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल. यासाठी दापोलीहून ब्राह्मणहितवर्धिनी सभेचे कलाकार येणार आहेत. १८ ऑगस्टपासून विनामूल्य प्रवेशिका द्यायला सुरुवात होईल.

 

टॅग्स :मुंबईनाटक