निवडणुकीचे काम करण्यास ठामपा कर्मचाऱ्यांचा नकार
By Admin | Updated: May 28, 2015 23:03 IST2015-05-28T23:03:27+5:302015-05-28T23:03:27+5:30
वसई-विरार महापालिकेच्या १७ जून रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या तब्बल ६९१ कर्मचारी, अधिकाऱ्यांना या निवडणुकीचे काम लागले आहे.
निवडणुकीचे काम करण्यास ठामपा कर्मचाऱ्यांचा नकार
ठाणे : वसई-विरार महापालिकेच्या १७ जून रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या तब्बल ६९१ कर्मचारी, अधिकाऱ्यांना या निवडणुकीचे काम लागले आहे. परंतु, पालघर जिल्हा वेगळा झाल्याने आणि अंतर लांब असल्याने बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी हे काम करण्यास नकारघंटा वाजविली असून यामध्ये महिलांचा अधिक समावेश आहे.
महापालिकेच्या ६९१ कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणूक विभागाकडून निवडणुकीच्या कामाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, आता या निवडणुकीसाठीचे क्लास, प्रशिक्षण आदींसाठी कर्मचाऱ्यांना पालघरला जावे लागत आहे. परंतु, ठाणे ते वसई-विरार हे अंतर लांब असल्याने वेळेत पोहोचणे शक्य नसल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यात आता हा जिल्हा वेगळा झाल्याने त्या जिल्ह्यात आम्ही कशासाठी जायचे, असा सवालही या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान लोकसभा, विधानसभा, त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका निवडणुका एकामागून एक होत गेल्याने ठाणे महापालिकेतील कामकाजालाही ब्रेक लागला आहे. आता वसई-विरार महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यानंतर, पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्याही निवडणुका आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची सध्या तारेवरची कसरत सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी खाजगीत व्यक्त केली आहे.
या निवडणुकीच्या कामाबरोबरच बीएलओचे कामही अनेक कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रभाग समितीमधील तब्बल ९० टक्के स्टाफ या कामासाठी जुंपला आहे. त्यामुळे प्रभाग समितीचीही कामे ठप्प होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पालिकेतील कामकाज बघायचे, निवडणुकीचे कामकाज बघायचे की, बीएलओचे काम पाहायचे, अशा विवंचनेत सध्या पालिकेतील कर्मचारी पडले आहेत.
यासंदर्भात उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता निवडणूक आयोगामार्फत हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे ते करावेच लागणार आहे. काही महिला कर्मचाऱ्यांनी लांबचे अंतर असल्याने या कामाबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. परंतु, त्यांनादेखील हे काम करावेच लागणार आहे. (प्रतिनिधी)