Join us

15 निष्पापांचे बळी घेणारी नीलकमल राजबंदर किनाऱ्यावर विसावली, विविध शासकीय यंत्रणा करणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:21 IST

अपघातानंतर जलसमाधी मिळालेली  नीलकमल प्रवासी बोट तेरा दिवसांपासून समुद्राच्या तळाशी रुतून बसली होती.

मधुकर ठाकूर -

उरण : नौदलाची स्पीड बोट आणि गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून घारापुरी बेटावर क्षमतेपेक्षा अधिक पर्यटकांना घेऊन निघालेल्या नीलकमल बोट यांच्यात १८ डिसेंबरच्या दुपारी अपघात घडला. या अपघातात १५ निष्पापांचे बळी घेतल्यानंतर नीलकमल लॉंच मंगळवारी घारापुरी बेटावरील राजबंदर किनाऱ्यावर येऊन विसावली.

अपघातानंतर जलसमाधी मिळालेली  नीलकमल प्रवासी बोट तेरा दिवसांपासून समुद्राच्या तळाशी रुतून बसली होती. भाऊचा धक्का-बूचरदरम्यानच्या समुद्राच्या तळाशी रुतून बसलेल्या नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणेसह मालकाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. तळ गाठलेल्या १५ पर्यटकांसाठी यमदूत ठरलेल्या निलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी अवजड टगबोटींचाही वापर केला होता. टगबोटींच्या साहाय्याने टोइंग करून नीलकमल बोटीला घारापुरी बेटावरील राजबंदर किनाऱ्यावर आणून सोडण्यात आले होते. भंग असल्याने किनाऱ्यावरील कोरड्या जागेत आणण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. 

बोट बुडाल्याचे कारण तपासणीनंतरच समजणार मंगळवारी पहाटेच्या सुमारास नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणले आहे. आता या बोटीची विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलिस नीलकमल बोटीची तपासणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. तपासणीनंतरच बोट नेमक्या कोणत्या कारणाने बुडाली याचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :रायगड