Join us  

'परदेशस्थ मराठी नागरिकांसाठी विधानभवनात ‘स्नेहकक्ष’ उभारणार', नीलम गोऱ्हे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 1:44 PM

Neelam Gorhe: महाराष्ट्रात व्यवसायाकरिता ज्या परदेशस्थ मराठी माणसांचे राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मुंबई  - महाराष्ट्रात व्यवसायाकरिता ज्या परदेशस्थ मराठी माणसांचे राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण होण्यासाठी विधानभवनातील उपसभापती कार्यालयात आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार व बुधवारी दुपारी ४ ते ८ या वेळेत भेटणार असून याकरिता ‘स्नेहकक्ष’ उभारण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

नवी मुंबई येथील सिडको येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलन-२०२४ कार्यक्रमास शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. 

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ज्यावेळी पहिल्यांदा पानिपत येथे स्मारकाला भेट दिली त्यावेळी समजले की, आजूबाजूच्या पाच जिल्ह्यांमध्ये मराठी लोकांचे वास्तव्य आहे. देशातील, परदेशातील मराठी माणूस एकत्रित आला पाहिजे. परदेशातील मराठी लोकांना अनेक सांस्कृतिक प्रश्न उद्भवत असतात त्यावर उपाययोजना व एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीने मराठी मंडळांसारखी व्यासपीठे असावीत. ज्यावेळी लंडनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात भेट दिली. त्याठिकाणी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकच वाचण्यासाठी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. आपली संस्कृती, इतिहास जपण्यासाठी ग्रंथालयात अनेकानेक मराठी पुस्तके असावीत याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे स्त्री आधार केंद्र यासंस्थेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचे कार्य करत असल्याने विविध देशांत महिलांच्या सुरक्षेबाबत, सशक्तीकरणाबाबत जे कायदे आहेत त्याची माहिती जाणून घ्यायची असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गकिल्ल्यावरील देवळांमध्ये दिवाबत्ती, सणावाराला फुलांची आरास होत नाही. याकरिता अशी ठिकाणे इतिहास संशोधकांच्या माध्यमातून शोधून तिथे दिवे लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींना अशी ठिकाणे माहीत असतील त्यांनी याबाबत माहिती देण्याचे आवाहन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले. 

टॅग्स :नीलम गो-हेमहाराष्ट्र सरकार