एमटीएचएलवर सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका हवी - वर्षा गायकवाड
By रेश्मा शिवडेकर | Updated: January 10, 2024 18:50 IST2024-01-10T18:50:06+5:302024-01-10T18:50:13+5:30
महानगर प्रदेशाला मुंबई जोडण्याच्या दृष्टीने या पुलाची उभारणी कऱण्यात आली आहे.

एमटीएचएलवर सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका हवी - वर्षा गायकवाड
मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पातील शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवर (एमटीएचएल) सार्वजनिक वाहनांकरिता स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात येणार आहे.
महानगर प्रदेशाला मुंबई जोडण्याच्या दृष्टीने या पुलाची उभारणी कऱण्यात आली आहे. एमटीएचएल हा त्यापैकीच एक असलेला प्रकल्प आहे. या सागरी सेतूमुळे नवी मुंबईतून अवघ्या २० मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचणे शक्य होईल . या प्रकल्पाची संकल्पना प्रथम काँग्रेसच्या काळात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडली. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यात आला. आता या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम पूर्ण होऊन तीन महिने झाले तरी तो खुला कऱण्यात येत नाही आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी तो लवकरात लवकर खुला कऱण्यात यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. हा पुल सार्वजनिक परिवहन सेवा देणाऱया एसटी, बेस्ट आदी उपक्रमांकरिता खुला असावा. इतकेच नव्हे तर या पुलावरील एक मार्गिका सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इतर मागण्या
-पूल लवकरात लवकर खुला करण्यात यावा
-सार्वजनिक वाहतुकीला टोल माफ करण्यात यावा
-टोलची रक्कम कमी कऱण्यात यावी