Need to reduce stress on doctors, World Mental Health Day special | डॉक्टरांवरील ताण कमी करण्याची गरज, जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष
डॉक्टरांवरील ताण कमी करण्याची गरज, जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष

मुंबई : वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यापासून ते थेट डॉक्टरची पदवी मिळेपर्यंत, त्यानंतरही प्रत्येक टप्प्यांवर वैद्यकीय तज्ज्ञांना आवाहानांना सामोरे जावे लागत असते. या क्षेत्रात प्रवेश मिळाल्यावर अभ्यासाचा ताण, डॉक्टर झाल्यावर स्पर्धेत टिकण्याचा ताण, त्यातही स्पेशलायझेशनसाठी घालवावा लागणारा मोठा कालावधी असतो. त्यानंतर, कुठे स्वत:चे रुग्णालय थाटण्याचा किंवा इतर योग्य रुग्णालयात नोकरी करण्यासाठी करावी लागणारी कसरत असते. यामुळे वैद्यकीय पेशात वावरणाऱ्या या डॉक्टर मंडळींना पूर्वीपेक्षा खूपच जागरूक राहावे लागते. म्हणजे सुरुवातीपासूनच डॉक्टर ताणाच्या चक्रव्यूहात अडकत जातात. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘काउन्सिल द काउन्सिलर’ अशी संकल्पना असून, या निमित्ताने डॉक्टरांवरील ताण कमी करण्याची गरजही व्यक्त होत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात सेवा देताना ‘२४ तास आॅन कॉल’ राहावे लागत असल्यामुळे काम आणि वेळेची अनिश्चितता असते. त्यातच अलीकडे आजारांचे वाढलेले प्रमाण आणि अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची अतिसंवेदनशीलता यामुळे दबाव वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या समुपदेशनाची गरज ठाणे मानसोपचार परिषदेचे अध्यक्ष डॉ. दीपक राठोड यांनी सांगितले.
डॉक्टरही माणूसच आहे. स्वत:चा विचार न करता ते प्रथम रुग्णसेवेला महत्त्व देतात. त्यानंतरही डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कामाचा अतिताण, त्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाºया मारहाणीची भीती. अशा वातावरण डॉक्टर सेवा पुरवत असतात, त्यांनाही विश्रांतीची गरज आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.फेबियन अल्मेडा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना किमान सात तास ड्युटी करणे बंधनकारक आहे. मात्र, पालिका रुग्णालयांतील डॉक्टर अतिरिक्त तास काम करत आहेत. रात्रपाळीत निवासी डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे इतर डॉक्टरांना जादा काम करावे लागते आहे. कामाच्या अतिताणामुळे डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नयन शहा यांनी नमूद केले.

उपाय : व्यायाम, योग-प्राणायाम : तणाव कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित व्यायाम, प्राणायाम, योगा, ध्यान-साधना करायला हवी, ज्यामुळे ताण कमी होऊन शारीरिक व मानसिक संतुलन साधले जाते.

छंद आणि कुटुंबाला वेळ : छंद जोपासल्यास तणाव कमी होऊन काही वेळ आनंदी राहता येते. नियमित झोप, जेवण्याची निश्चित वेळ, कुटुंब व मित्रांना वेळ देणे यामुळे ताण कमी होतो. डॉक्टरांवरील ताण कमी झाल्यास संभाव्य आजारांना आळा तर बसेलच, शिवाय रुग्णांना योग्य संवाद साधून उत्तम सेवा देणे शक्य होईल. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसोबत होणारा वाद टाळला जाईल.

ताण घालविण्यासाठी हे करा
नियमित व्यायाम करा, जेवण, झोप यांचे वेळापत्रक कसोशीने पाळा, योगा, प्राणायाम, ध्यान-साधनेने ताण कमी होण्यास मदत होते, कार्यालयातील टेन्शन घरी घेऊन जाऊ नका, कामाबाबत समाधानी राहा, मोबाइलचा अतिरिक्त वापर टाळा, मित्र, कुटुंबाला वेळ द्या, संवाद ठेवा, सामाजिक कार्याला वेळ द्या. छोटेसे कामही मनाला खूप समाधान देते.


Web Title: Need to reduce stress on doctors, World Mental Health Day special
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.