कोयनेच्या पाण्यासाठी परवानगीची गरज
By Admin | Updated: November 18, 2015 00:03 IST2015-11-17T23:11:15+5:302015-11-18T00:03:41+5:30
माधव चितळे : लोकोपयोगी वनांची पुनर्रचना हवी

कोयनेच्या पाण्यासाठी परवानगीची गरज
चिपळूण : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज आहे. मात्र, मुंबईला पाणी पाहिजे की नको, यावर विचार व्हायला हवा, असे मत जलतज्ज्ञ माधव चितळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कोकणात किती ठिकाणी पाणी साठवले जाऊ शकते, यासाठी जलसिंचन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. कोकण रेल्वेसाठी परिसरातील जनतेने जमिनी दिल्या. मात्र, जलसिंचनासाठी जमिनी मिळणे अवघड बनत आहे. त्यामुळे जनतेत पाण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे चितळे यांनी सांगितले.
कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज आहे. मुंबईला पहिले पाणी पाहिजे की नाही, हे विचारणे गरजेचे आहे. मुंबईला पाण्याची गरज आहे का, याचाही विचार व्हायला हवा. कोकणात खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. विदर्भापेक्षा कोकणाची परिस्थिती वेगळी आहे. लोकोपयोगी वनांची पुनर्रचना व्हायला हवी. त्याचप्रमाणे नवीन लागवडही करणे गरजेचे आहे. तरच कोकणाचे निसर्गसौंदर्य टिकून राहिल, असे ते म्हणाले. भविष्याचा विचार करून सरकारकडे जलसिंचन आराखडा पाठवण्यात आला आहे. परंतु, या आराखड्याबाबत शासनाने गांभिर्याने विचार करणे कोकणच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे चितळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
कोकणात चांगल्या प्रकारे पाऊस पडतो. त्यामुळे येथे दुष्काळ नाही. मराठवाड्यासारखी स्थिती दिसून येत नाही. जलसिंचनासाठी सामूहिक लोकजागृती करण्याची गरज आहे, असे मत चितळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.