मनोरुग्णालयांची संख्या वाढवणे गरजेचे
By Admin | Updated: October 10, 2014 03:08 IST2014-10-10T03:08:50+5:302014-10-10T03:08:50+5:30
भारतातील १ कोटी मनोरुग्ण असे आहेत, की ज्यांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार देणे गरजेचे आहे. मात्र देशात सध्या केवळ ४३ मनोरुग्णालये आहेत

मनोरुग्णालयांची संख्या वाढवणे गरजेचे
मुंबई : भारतातील १ कोटी मनोरुग्ण असे आहेत, की ज्यांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार देणे गरजेचे आहे. मात्र देशात सध्या केवळ ४३ मनोरुग्णालये आहेत. त्यांची क्षमता केवळ १९ हजार आहे. त्यामुळे उर्वरित रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. त्यामुळे मनोरुग्णालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टरांशी संवाद साधला असता, हा सूर उमटला.
‘लिव्हिंग विथ स्किझोफ्रेनिया’ ही यंदाच्या मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. जगात १०० ते २०० व्यक्तींमागे एकाला स्किझोफ्रेनियाने ग्रासलेले असते. वेळीच उपचार मिळाल्यास हा आजार नियंत्रणात राहू शकतो, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या मनोविकृती चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. निलेश शहा यांनी दिली. डोपामिन केमिकल वाढल्यामुळे हा आजार होतो. हे केमिकल वाढण्याच्या कारणांविषयी संशोधन सुरू आहे. यात सुरुवातील व्यक्ती संशयी आणि नंतर हिंसक होते. पहिल्या ८ ते १२ आठवड्यांमध्ये उपचार मिळाल्यास फायदा होतो, असेही डॉ. शहा यांनी सांगितले.
मानोरुग्णांवर उपचार करताना शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्तराचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी सांगितले. ‘क्लिनीकल सायकॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान खूपच कमी असते. हा अभ्यासक्रम रुग्णालयाशी संलग्न ठेवून शिकवला पाहिजे, असे डॉ. देव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)