नावीन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशीलतेला अधिक चालना देण्याची गरज : राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:44+5:302021-02-05T04:26:44+5:30

राज्यपाल : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन वार्षिक दीक्षान्त समारंभात मांडले मत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, ...

The need to give more impetus to entrepreneurship with a focus on innovation: Governor | नावीन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशीलतेला अधिक चालना देण्याची गरज : राज्यपाल

नावीन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशीलतेला अधिक चालना देण्याची गरज : राज्यपाल

राज्यपाल : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन वार्षिक दीक्षान्त समारंभात मांडले मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, नॅनो तंत्रज्ञान मागे पडून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र पुढे आले आहे. जगासह देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अनेक समाजोपयोगी संशोधन होत आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना नावीन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशीलतेला चालना देण्याची गरज असून कालपरत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांना अनुसरून शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज असल्याचे मत राज्यपाल व राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलपती असणारे भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज ऑनलाइन माध्यमातून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. पदवी प्राप्त करणे ही केवळ शिक्षणाची सुरुवात आहे, शेवट नाही आहे, असे सांगताना विद्यार्थ्यांनी आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा, असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले. तसेच आपण नोकरी मागणारे न होता रोजगाराच्या संधी निर्माण करणारे होऊ शकतो का याचा देखील स्नाताकांनी विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

दीक्षान्त समारंभाला कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे मान्यवर सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या विकासात्मक अहवालाचे वाचन करताना कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमांसाठी लवकरच सेंटर फॉर ई- लर्निंग अँड कम्प्युटेशनल फॅसिलिटी स्थापन केले जाणार असल्याची माहिती दिली.

* १६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके बहाल

सोमवारी पार पडलेल्या ऑनलाइन दीक्षान्त समारंभात पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्यात. या पदवीदान समारंभामध्ये ९८ हजार २६१ विद्यार्थिनी, तर ९३ हजार २३४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके बहाल करण्यात आली.

.......................

Web Title: The need to give more impetus to entrepreneurship with a focus on innovation: Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.