राज्यात राष्ट्रवादीचीच लाट--कोल्हापुरातील विराट जाहीर सभेत प्रचाराचा बिगुल

By Admin | Updated: September 16, 2014 23:38 IST2014-09-16T23:10:22+5:302014-09-16T23:38:04+5:30

शरद पवार यांचा विश्वास

NCP's wave in the state - Vibrating public rally in Kolhapur | राज्यात राष्ट्रवादीचीच लाट--कोल्हापुरातील विराट जाहीर सभेत प्रचाराचा बिगुल

राज्यात राष्ट्रवादीचीच लाट--कोल्हापुरातील विराट जाहीर सभेत प्रचाराचा बिगुल


कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीतील लाट शंभर दिवसांत ओसरली, त्यामुळे तो पराभव आता विसरून जावा. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचीच लाट असून राज्यातील जनतेने पुन्हा ‘राष्ट्रवादी’च्याच हातात सत्ता द्यावी. देशात नावलौकिक होईल असा कारभार करून दाखवू अशी ग्वाही या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी येथे झालेल्या विराट प्रचार प्रारंभ सभेत दिली. येथील गांधी मैदानावर ही जाहीर सभा झाली.
पवार यांच्या हस्ते नारळ फोडून राष्ट्रवादीने प्रचाराचे रणशिंग फुंकले. या सभेच्या निमित्ताने प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिली. सभेसाठी कोल्हापूरसह सांगली,सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे होते.
या सभेत पवार यांनी पंधरा मिनिटांच्या भाषणात राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामाच मांडला. ते म्हणाले, ‘देश व राज्यभर लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असताना कोल्हापूरने मात्र पुरोगामी विचारांची कास सोडली नाही. येथून धनंजय महाडिक यांना विजयी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आता केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यापासून माणसा-माणसांतील अंतर वाढू लागले आहे. धार्मिक शक्ती उफाळून येऊ पाहत आहेत. नको ते विषय उकरून काढले जात आहेत.
साईबाबा कुणाच्या पोटी जन्माला आले हा वाद धर्मसंसदेतून निर्माण केला जात आहे. याच धर्मसंसदेने कधी काळी शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांना वेगळी वागणूक दिली होती. या देशाला फक्त एकच संसद माहीत आहे व ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने अस्तित्वात आली आहे. धर्माच्या नावाने चालणारी संसद कुणी मजबूत करत असेल तर अशी सांप्रदायिक विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही.’
भाजपच्या सरकारबद्दलची नाराजी जनतेने तीन महिन्यांत व्यक्त केली आहे. महाराष्ट्र बलवान करायचा असेल तर राष्ट्रवादीला शक्ती द्या. नवी पिढी राष्ट्रवादीच्या बाजूने उभी राहत आहे, त्यांना ताकद देऊ. कांही चेहरे बदलायला लागले तर अवश्य बदलू. महाराष्ट्राचे पुढच्या वीस वर्षाचे नेतृत्व करु शकेल अशी नेतृत्वाची फळी राष्ट्रवादीकडे आहे. आम्हांला पुन्हा सत्ता द्या. हे राज्य आताही देशात एक नंबरचे आहेच. देशाचा राज्यकारभार कसा करायचा याचा धडा घेता येईल इतका चांगला कारभार करून दाखवू.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री शशीकांत शिंदे, खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, आमदार के.पी.पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची भाषणे झाली. आभार आर. के. पोवार यांनी मानले.

तर नवरा कोण, बायको कोण ? : छगन भुजबळ
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘शिवसेना-भाजपचे नेते जागावाटपावरून एकमेकांना नवराबायकोची उपमा देऊ लागले आहेत. उद्या १४४-१४४ असे जागावाटप झाले तर नवरा कोण व बायको कोण होणार...? दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली; परंतु त्याचा अहवाल अजून का प्रसिद्ध केला जात नाही..? भाजपच्या कार्यकारिणीत सहस्त्रबुद्धे, महाजन येतात मग त्यामध्ये पाशा पटेल, फुंडकर का चालत नाहीत..? ओबीसी समाजाचे काम करणाऱ्या नेत्यांना श्रीमंत देवेंद्र फडणवीस हे जर नौटंकी म्हणत असतील तर मग मुंडे हे देखील नौटंकी करत होते असे त्यांना म्हणायचे आहे का? अशी विचारणाही भुजबळ यांनी केली. भाजपने कितीही वल्गना केल्या तरी आम्ही घेतलेले निर्णय बदलण्याची कुणाच्या बाप्पाची हिंमत नाही.’

.....कोणते तीर्थ शिंंपडले : भुजबळ
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दम असेल तर शिवसेनेने भाजपची संगत सोडून दाखवावी असे आव्हान दिले. भाजप हा साधुसंताचा नव्हे तर संधीसाधूंचा पक्ष असून गावित- पाचपुते-अजित घोरपडे यांच्यावर कालपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने त्यांच्यावर कोणते तीर्थ शिंपडले, की ज्याने ते पवित्र झाले हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे असा घणाघाती आरोप केला.

उदयनराजेंची पाठ
पक्षाची प्रचार प्रारंभ सभा असतानाही त्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र पाठ फिरवली. खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित नव्हत्या. त्याची सभास्थळी चर्चा होती.

शेट्टी खासदारकीवर लाथ मारा : आर. आर.
तीन महिन्यांत केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराने शेतकरी देशोधडीला लागला असताना ‘स्वाभिमानी’ नेते कोठे आहेत? असा सवाल करत राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचा जराही कळवळा असेल तर त्यांनी खासदारकी वर लाथ मारावी व बिहार मध्ये जाऊन कृषिमंत्र्याच्या दारात बसावे, वाटल्यास रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था करतो, पण एकदा शेतकऱ्यांच्या की सरकारच्या बाजूचे ते कृतीतून दाखवा, असे आव्हान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे केले.
शिवसेना-भाजपवर सडकून टीका करत ते म्हणाले, लोकसभेतील यशामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या मंडळींना सभेच्या गर्दीने चोख उत्तर दिले आहे. कोणाच्या तरी लाटेवर स्वार न होता, स्वत:ची लाट निर्माण करणारी ही शाहू महाराजांची भूमी असल्याचे सांगत अशा पुरोगामी भूमीतून राष्ट्रवादी नंबर वन करण्याचा निर्धार करत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब येथील पोटनिवडणूकीचे निकाल पाहिले तर अमित शहांची जादू संपली असून मोंदींचे लाट ही खल्लास झाली आहे.

शंभर दिवसांत
टोल रद्द करू : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्यास शंभर दिवसांत कोल्हापूरचा टोल रद्द करून दाखवू अशी घोषणा केली.

Web Title: NCP's wave in the state - Vibrating public rally in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.