Join us  

शरद पवार हृदयात राहतीलच, पण...; 'मातोश्री'कडे निघण्याआधी सचिन अहिर यांची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:32 AM

'राष्ट्रवादी सोडताना फार आनंद नाही, पण काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिरराष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधणार आहेत. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठे भगदाड पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर आज  शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण, यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर यांनी सांगितले. तसेच, राजकारणात कधीतरी काही निर्णय घ्यावे लागतात, ते चूक की बरोबर सांगता येत नाही. राष्ट्रवादी सोडताना फार आनंद नाही, पण काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. उद्धव ठाकरे, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे, असे सचिन अहिर म्हणाले. 

याशिवाय, शरद पवार यांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना या सगळ्या गोष्टी सांगण्याचे धाडस झाले नाही. वरळी विधानसभा क्षेत्रातील राजकीय परिस्थिती त्यांच्या समोर मांडण्याचाही प्रयत्न केल्याचे सचिन अहिर यांनी  सांगितले. याचबरोबर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून असे जाणवले की, त्यांच्याकडे विकासाची कामे करण्याची जिद्द आहे. अशा तरुण नेतृत्वाला साथ देण्याची गरज असल्याचेही सचिन अहिर यांनी सांगितले. 

दरम्यान, सचिन अहिर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये भावनिक आवाहन करत मातोश्रीवर प्रवेशावेळी उपस्थित राहावे, असे सांगितले आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल असे सांगण्यात येत आहे. सध्या वरळी मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत.  

टॅग्स :सचिन अहिरशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई