राष्ट्रवादीचे सत्तेचे गणित बिघडणार
By Admin | Updated: August 11, 2014 23:35 IST2014-08-11T23:05:29+5:302014-08-11T23:35:20+5:30
जिल्हा परिषद : पाच नेते सेना-भाजपमध्ये दाखल; डोकेदुखी वाढली

राष्ट्रवादीचे सत्तेचे गणित बिघडणार
सांगली : राष्ट्रवादीच्या पाच दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजप, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे, त्यांचे समर्थक असलेल्या नऊ सदस्यांनीही पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गणित बिघडणार आहे. खानापूर आणि जत पंचायत समितीमधील घड्याळाची टिकटिकही थांबण्याची शक्यता आहे. येत्या १३ सप्टेंबरला पंचायत समिती सभापतींचा, तर २० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपत असून, पुढील पदाधिकारी निवड गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे पक्षाचे नेतेही पक्षातून बाहेर पडणाऱ्यांविरोधात सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
जिल्हा परिषदेत पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या ३३ आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) गटातील योजना शिंदे आणि कवठेमहांकाळ गटातील गजानन कोठावळे हे दोन अपक्ष सदस्य असून ते गृहमंत्री आर. आर. पाटील गटाचे आहेत.
जनसुराज्यचे संख गटातील सदस्य बसवराज पाटील यांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. ही बेरीज केल्यानंतर राष्ट्रवादीकडे ३६ सदस्य दिसतात. राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढविल्यामुळे जिल्हा परिषदेत चांगले यश मिळाले. दहापैकी सहा पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पण, लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेला विरोधकांकडून भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने संजय पाटील यांना पक्षात घेऊन खासदार केले.
जतचे राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप यांनी त्यांना रसद पुरवली होती. सध्या जगतापांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करून भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा परिषदेत संजय पाटील-जगताप समर्थक चार सदस्य आहेत. हे सदस्य नेते म्हणतील तो निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे भाजपच्या वाटेवर असून ते तासगाव-कवठेमहांकाळमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र माळी आणि सदस्य तानाजी यमगर हे सदस्य त्यांचे समर्थक आहेत. मात्र सध्या हे दोन्ही सदस्य, आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत आहेत. पण, घोरपडेंचा आदेशही ते मोडू शकणार नाहीत. राष्ट्रवादीचे तीन दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील समर्थक विट्याचे माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. त्यांच्या गटाचे दोन जि. प. आणि खानापूर पंचायत समितीत सात सदस्य आहेत. गृहमंत्री पाटील समर्थक कवठेपिरानचे सदस्य भीमराव माने यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे एक जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तरी ते राष्ट्रवादीतच आहेत, मात्र सेना-भाजपचे नेते मात्र त्यांच्या संपर्कात आहेत. कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यास ते कोणत्याहीक्षणी महायुतीत दाखल होऊ शकतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेगवान घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादीलाच सर्वाधिक गळती लागली असून गृहमंत्री पाटील समर्थक शिवसेनेत, तर ग्रामविकासमंत्री समर्थक भाजपमध्ये दाखल होताना दिसत आहेत.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीची स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता धोक्यात आली आहे. सेना-भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांकडे नऊ जि. प. सदस्य आहेत. त्यांनी ठरविले तर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गणित बिघडू शकते. (प्रतिनिधी)
स्वतंत्र गटाबद्दल सदस्यांमध्ये संभ्रम
जिल्हा परिषदेतील आठ सदस्यांचे नेते सेना-भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जवळपास दहा सदस्य दोन्ही काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षांतर्गत कायद्यानुसार एकतृतीयांश सदस्यांनी स्वतंत्र गट केल्यास ते बाहेर पडू शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले, तर ज्येष्ठ नेते अॅड. बाबासाहेब मुळीक यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षांतर बंदी कायद्यात २००६ मध्ये बदल झाल्यामुळे स्वतंत्र गट करून सदस्य बाहेर पडू शकत नाहीत. महापालिकेतील एक अधिकारी म्हणाले की, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६-८७ च्या तरतुदीनुसार दोनतृतीयांश सदस्यांनी स्वतंत्र गट तयार केल्यास त्याला मान्यता मिळू शकते. या मत-मतांतरामुळे जिल्हा परिषदेत नेमके काय होणार, याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.