राष्ट्रवादी काँग्रेसचा हायटेक प्रचाराचा धडाका
By Admin | Updated: October 8, 2014 01:48 IST2014-10-08T01:48:08+5:302014-10-08T01:48:08+5:30
विधानसभा निवडणूक २०१४ च्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. यंदा पक्षाने हायटेक प्रचार यंत्रणेवर भर दिला आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचा हायटेक प्रचाराचा धडाका
मुंबई : विधानसभा निवडणूक २०१४ च्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. यंदा पक्षाने हायटेक प्रचार यंत्रणेवर भर दिला आहे. राष्ट्रवादीच्या हायटेक प्रचारात फेसबुक, टिष्ट्वटर, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, वेबसाइटसोबतच आता थ्रीडी होलोग्राफिक प्रोजेक्शनद्वारे राज्यांतील प्रमुख शहरे, गावांमध्ये जोरदार प्रचार सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिली.
या थ्रीडी सभांच्या माध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून निवडणूक काळात राज्यभरात पक्षाच्या विविध नेत्यांच्या सुमारे १००० थ्रीडी सभांचे आयोजन केले आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, आर.आर. पाटील, खा. सुप्रिया सुळे आदी नेत्यांच्या सभा होणार आहेत.
थ्रीडी सभांकरिता पक्षाच्या वतीने ३० वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याच्या विविध शहरांत, गावांमध्ये पक्षाच्या दररोज १२० थ्रीडी सभा होणार आहेत. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली असून त्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
या थ्रीडी सभांविषयी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कला, साहित्य, सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काही मोजकेच दिवस राहिले आहेत. या कमी कालावधीत पक्षाचे नेते राज्यातील सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, याचा विचार करून आम्ही थ्रीडी सभांच्या माध्यमांतून राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचे ठरविले. या निवडणुकीत थ्रीडी होलोग्राफिक प्रोजेक्शनचा वापर करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिलाच पक्ष ठरला आहे.
थ्रीडी सभांसाठी प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, राष्ट्रवादी सहकार सेलचे प्रमुख विश्वास ठाकूर, मीडिया प्रभारी आनंद परांजपे, माध्यम समन्वयक रविकांत वर्पे, सोशल मीडिया प्रमुख मल्हार टाकळे, मीडिया सदस्य अभिजित झांबरे-पाटील, तसेच सूरज चव्हाण, नासीर खान नियोजन करीत
आहेत. (प्रतिनिधी)