राष्ट्रवादी काँग्रेसचा आजपासून प्रचार

By Admin | Updated: March 6, 2015 23:51 IST2015-03-06T23:51:35+5:302015-03-06T23:51:35+5:30

विकासाच्या मुद्यांवरच निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्णय घेणा-या राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचाराचा नारळ शनिवारी फुटणार आहे.

NCP's campaign from today | राष्ट्रवादी काँग्रेसचा आजपासून प्रचार

राष्ट्रवादी काँग्रेसचा आजपासून प्रचार

नवी मुंबई : विकासाच्या मुद्यांवरच निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्णय घेणा-या राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचाराचा नारळ शनिवारी फुटणार आहे. कोपरखैरणेमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असून त्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमधील अपयशानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. डिसेंबरमध्ये पक्षाचे येथील सर्वेसर्वा गणेश नाईक पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे क्रमांक एकचा पक्ष शेवटच्या क्रमांकावर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. सहा नगरसेवकांनी आतापर्यंत पक्ष सोडला आहे. अशा स्थितीमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी शनिवारी ७ मार्चला कोपरखैरणेमधील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पालिकेची स्थापना झाल्यापासून नाईकांची एकहाती सत्ता आहे. यावेळी पहिल्यांदाच त्यांना शिवसेना व भाजपचे तगडे आव्हान असणार आहे. कोणावरही विनाकारण टीका करायची नाही, विकासाच्या मुद्यांवर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आतापर्यंत शहरात केलेल्या कामांची व भविष्यात करणाऱ्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये विकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. दहा वर्षांत पाणीबिल व मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. शहरातील रस्ते व इतर केलेली कामे नागरिकांना सांगण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या मेळाव्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मेळाव्यास माजी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, नरेंद्र पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: NCP's campaign from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.