‘राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल’
By Admin | Updated: October 11, 2014 03:34 IST2014-10-11T03:34:59+5:302014-10-11T03:34:59+5:30
मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतायत, यातच त्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची अवस्था किती वाईट आहे हे कळते. गेल्या सव्वाशे दिवसांत मोदी बोललेत खूप. पण केले काही नाही. ‘

‘राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल’
आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये ही निवडणूक जास्त आव्हानात्मक आहे, असे वाटते का?
- प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मकच असते. प्रत्येक निवडणुकीला स्वत:चे वैशिष्ट्य असते. ूआपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवण्याची संधी असते.
पण पंतप्रधान मोदींच्या सभांमागून प्रचार सभा चालल्या आहेत... भाषणांना गर्दी जमतेय.
- मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतायत, यातच त्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची अवस्था किती वाईट आहे हे कळते. गेल्या सव्वाशे दिवसांत मोदी बोललेत खूप. पण केले काही नाही. ‘अच्छे दिन’ कधी आलेच नाहीत. उद्घाटने खूप केलीत. पण ती सर्व मागील यूपीए सरकारची कामे होती. वाणी मिठ्ठास असेल तर वस्तू विकली जाते आणि व्यापार चांगला होतो, हे वास्तव आहे. पण राज्य चालवताना नेत्याकडे आवाका लागतो, दूरदृष्टीे, सखोल अभ्यास, प्रचंड अनुभव आणि वास्तवाचे भान लागते, संघटनात्मक रचना उभी करावी लागते, सर्व घटकांच्या समावेशाचा विचार करावा लागतो, प्रशासनावर पकड लागते.
या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रांतवाद, छुपा अजेंडा लोकांना कळून चुकले आहे. तेव्हा लोकसभेत लिहिलेली निवडणूक निकालांची पाटी जनतेनेच पार पुसून टाकली आहे. विधानसभेचे निकाल वेगळे असतील आणि त्यात राष्ट्रवादीलाच बहुमत असेल.
भाजपाकडून महाराष्ट्राची बदनामी चालल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.
- खूप खालच्या पातळीवरची बदनामी भाजपाने केली आहे आणि जनतेत तीव्र प्रतिकिॅया उमटलेल्या आहेत. लोकशाहीत परस्पर टीका ही व्हायचीच, पण बदनामी करणारे लोक महाराष्ट्र तोडायला-खच्ची करायला निघाले आहेत, हेही लोकांना कळून चुकले आहे. आता भाजपालाच जनता सांगते आहे, ‘जनता तुम्हे माफ नही करेगी!’
भाजपाला एकटे पाडण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना-मनसे अशी युती जन्म घेऊ शकते, असे भाजपाच्या गोटात बोलले जात आहे.
- स्वत:चा पराभव दिसायला लागला की गोबेल्सप्रेमी मंडळी अफवा पसरवू लागतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा निश्चित ध्येयधोरणे घेऊन चालणारा पक्ष आहे आणि भविष्यातील वाटचालही याच ध्येयधोरणानुसार होईल, अशी ग्वाही मी देतो.
तुमची आणि काँग्रेसची ध्येयधोरणे तर समान होती, मग आघाडी का तुटली?
- हा प्रश्न महाराष्ट्राची जनताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारते आहे. जातीयवादी शक्तींशी एकत्र लढलो असतो, तर चांगले झाले असते. पण चव्हाण यांच्या हटवादीपणामुळे सगळे बिनसले. असो. आम्ही आता खूप पुढे गेलो आहोत. राष्ट्रवादीवर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास खूप मोठा आहे...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे...
- राष्ट्रवादीची वाढलेली ताकद त्यांना खुपते आहे. खरे तर मुंबई-ठाणे या महापालिकांचा कारभार करण्यात शिवसेनेला अपयश आले. मनसेने नाशिकची पुरती वाट लावलेली आहे. मुंबई-ठाण्याला रसातळाला नेण्यात भाजपाही सहभागी आहे. हे सगळे झाकण्यासाठी राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे.
प्रश्न : राष्ट्रवादीच्या कोणत्या कामांसाठी जनता आपल्याला कौल देईल असे वाटते?
सुनील तटकरे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी नेत्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक उत्तम निर्णय घेतले आहेत, शेती, शेतीपूरक उद्योग, रस्ते, वीज, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, उद्योग, मागासवर्गीय घटकांना संरक्षण, आरक्षणाचा विस्तार, इतर महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. आज आपले राज्य गुजरातच्या पुढे पहिल्या क्रमांकाचे आहे हे अभिमानाने सांगू इच्छितो.