Join us

राष्ट्रवादीला ठाणे-कल्याण लोकसभेसाठी उमेदवार मिळेना, गणेश नाईकांसह जितेंद्र आव्हाडांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 04:02 IST

शरद पवारांनी घेतली मुलाखत : गणेश नाईकांसह जितेंद्र आव्हाडांचा नकार

अजित मांडके

ठाणे : ठाणे आणि नवी मुंबईत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असतानाही पक्षाला ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी ठाणे आणि नवी मुंबईतील दोन दिग्गज नेत्यांची मुलाखत घेऊन या दोघांनाही ठाणे आणि कल्याण लोकसभा निवडणूक लढवावी, असे सांगितले. परंतु, या दोघांनीही आपण तयार नसल्याचे सांगून यातून काढता पाय घेतला. एकूणच ठाणे आणि कल्याणला राष्ट्रवादीला उमेदवार मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या ठाणे शहर राष्टÑवादीमध्ये आलबेल वातावरण आहे. गुरुवारी काही नाराजांनी पुन्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा एका ज्येष्ठ नगरसेवकाने शरद पवार यांची भेट घेतली. या नगरसेवकाने तर पुढील आठवड्यात बघा काय निर्णय येतो, असे सांगून इतर माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे. दुसरीकडे शुक्रवारीच शरद पवार यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील दिग्गज नेते म्हणजेच जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांनादेखील बोलावले होते. यावेळी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांसाठी या दोघांबरोबर चर्चा झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. यावेळी आव्हाडांना कल्याण लोकसभा निवडणूक लढवावी आणि नाईकांनी ठाणे लोकसभा लढवावी, अशा सूचना त्यांनी या दोघांना दिल्या.त्यातही पराभव झाला तरी आव्हाडांना त्यांचा कळवा-मुंब्रा मतदारसंघ दिला जाईल किंवा जिंकले तर त्या ठिकाणी त्यांच्या घरातीलच मंडळीला संधी दिली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे गणेश नाईक यांनीसुद्धा ठाणे लोकसभा लढवावी, असे सांगण्यात आले. निवडून आल्यास दिल्लीला जाण्याची संधी मिळणार आहे. 

टॅग्स :शरद पवारठाणे