Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahaparinirvan Din: “समीर वानखेडे माझ्यासोबत नमाजाला नियमित यायचे, चैत्यभूमीवर प्रथमच दिसले”: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:15 IST

दादर येथील चैत्यभूमीवर समीर वानखेडे यांनी हजेरी लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

मुंबई: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादर येथील चैत्यभूमीवर राज्यातील मंत्री, नेते यांच्यासह हजारो अनुयायांनी उपस्थिती लावत महामानवाला अभिवादन केले. मात्र, यावेळीही नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पढायला नियमित यायचे. चैत्यभूमीवर प्रथमच दिसले, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. 

दादर येथील चैत्यभूमीवर समीर वानखेडे यांनी हजेरी लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मात्र, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने घेतली. यानंतर काही मिनिटांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक चैत्यभूमीवर पोहोचले. यावेळी पत्रकारांनी नवाब मलिक यांना समीर वानखेडेंबाबत विचारणा करण्यात आली. 

ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. अभिवादन करणारा फक्त ठराविक समाजाचा, जातीचाच असायला हवा, असा समज असेल, तर तो चुकीचा आहे. मला वाटते की, आम्ही दरवर्षी इथे येतो. पण काही लोकांनी या वर्षीपासून यायला सुरूवात केली आहे. आता जय भीम नावाचा एक सिनेमा आला आहे. हा सिनेमा तळागाळातल्या समाजाचा संघर्ष दाखवणारा आहे. त्याप्रमाणेच मी जो संघर्ष सुरू केलेला आहे, त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरू झाला आहे. त्यामुळे लोक अभिवादन करायला यायला लागले आहेत. समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरिता आले का नाही, हे मला माहित नाही; पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. 

दरम्यान, समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन बाहेर आले असता, काही भीमसैनिकांनी त्यांच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येण्याकरिता आक्षेप घेतला. यामुळे काही काळासाठी वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. समीर वानखेडेंना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारधारेवर चालले पाहिजे. समीर वानखेडेंना यंदा चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली, अशी विचारणा भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने केली. 

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरनवाब मलिकसमीर वानखेडे