Join us  

दोनदा राज्यसभा दिली, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हतीः सुप्रिया सुळेंचा तारिक अन्वरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:51 AM

आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पवारांवरही तोफ डागली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ज्यांना दोन वेळा महाराष्ट्रातील आमदारांनी राज्यसभेवर निवडून पाठवलं. आता ते पक्षाचे लोकसभेतील नेते होते. ते एक उत्तम संघटक आहेत. त्यामुळे त्यांना निवडून देण्यात आम्हाला अभिमानच वाटला. एवढा विश्वास आम्ही त्यांच्यावर ठेवला. त्यांना नेता मानलं.तारिक अन्वरजी 'आपने दिल तो तोड दिया.' राजीनामा देण्यापूर्वी एकदा तरी आमच्याशी बोलायला हवं होतं. वाईट या गोष्टीचं वाटतं की, ज्या माणसावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, नेता मानला त्यांनी खातरजमा न करता राजीनामा दिला. असं होत असेल तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा ?, असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.पवार साहेब मराठीत बोलले होते, दिल्लीतल्या कुठल्या तरी पेपरमध्ये वाचून त्यांनी हा निर्णय घेतला. त्याआधी एकदा बोलायला हवं होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच राफेलच्या मुद्द्यावरून पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय. पवार साहेबांनी राफेलच्या डीलवर शंका उपस्थित केली आहे. 

टॅग्स :सुप्रिया सुळेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसराफेल डील