Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जाणूनबुजून महात्मा फुले अन् बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतेय; जयंत पाटलांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 13:03 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणूनबुजून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीट करत केला आहे. दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. 

महात्मा फुले हे उद्योजक देखील होते. त्यांनी उभी केलेली रचनात्मक सामाजिक कामे ही स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केलेली आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधिज्ञ, पत्रकार व प्राध्यापक होते. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यावेळी ते केंद्रीय मजूर मंत्री होते याची आठवण जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना करुन दिली आहे.

राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ’फुले - आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या’ हे विधान करणे अत्यंत चुकीचे तर आहेच पण महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला 'भीक' मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणूनबुजून केलेला अपमानच आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :जयंत पाटीलचंद्रकांत पाटील