Join us  

Exclusive: “२०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये”; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 1:47 PM

अशक्य गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना करून दाखवली, असं धनंजय मुंडेंनी लोकमतशी बोलताना सांगितलं.

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप झडताना पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावत, किमान २०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईन, परत येईन, असं काही म्हणू नये, असं म्हटलं आहे. 

लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस अंतर्गत धनंजय मुंडे यांची मुलाखत घेतली. यावेळी राजकारणाच्या पलीकडे धनंजय मुंडे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कॉलेज जीवन, राजकारणातील प्रवास, गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव आणि पंकजा मुंडेंशी असलेले संबंध यांसारख्या विषयावर सविस्तर भाष्य केलं. याच मुलाखतीत बोलताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. 

२०२४ पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये

भाजपमध्ये असताना धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध होते, मित्रही होते. याबाबतत धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आले. देवेंद्र फडणवीस हे चांगले संघटक आहेत. संघटक म्हणून संघटनेत काम करताना राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत देवेंद्र फडणवीस पोहोचले. ही सुलभपणे घडलेली गोष्ट नाही. भारतीय जनता पक्षातील ही सहजासहजी हे शक्य नव्हतं. अशक्य गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना करून दाखवली, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुन्हा येईन, पुन्हा येईन, परत येईन’ म्हणू नये. त्यापेक्षा जे काही करायचं असेल, बोलायचं असेल, ते निवडणुकांमध्येच बोलावं. आता जे काही आहे, ते २०२४ मध्ये करावं, असा सल्ला देत खोचक टोला लगावला. 

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. मराठवाड्याच्या विकासात त्यांचं फार मोठं योगदान आहे. अशोक चव्हाण यांचा मराठवाड्याचे मोठे नेते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

टॅग्स :धनंजय मुंडेलोकमतदेवेंद्र फडणवीस