मुच्छड पानवाला, कोमल रामपाल यांना एनसीबीचे समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:37+5:302021-01-13T04:12:37+5:30
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) केम्स कॉर्नर ...

मुच्छड पानवाला, कोमल रामपाल यांना एनसीबीचे समन्स
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) केम्स कॉर्नर येथील मुच्छड पानवाला याच्याकडे चौकशी करणार आहे. शनिवारी जप्त केलेल्या परदेशी गांजाच्या विक्रीशी त्याचा संबंध असल्याची माहिती मिळाल्याने, त्याला समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अभिनेता अर्जुन रामपाल याची बहीण कोमल राजपाल हिच्याकडे पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याने, तिलाही समन्स बजावले असल्याचे सांगण्यात आले.
एनसीबीच्या पथकाने गेले दोन दिवस पश्चिम उपनगरात छापे टाकून तब्बल दोनशे किलो परदेशी गांजा जप्त केला. या प्रकरणी राहिला फर्निचरवाला, तिची बहीण शहिस्ता फर्निचरवाला आणि ब्रिटिश नागरिक करण सजनानी यांना अटक केली. राहिला वगळता दोघांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून केम्स कॉर्नर येथील मुच्छड पानवालाचे नाव समोर आले. सजनानीकडून आलेला गांजा त्याच्याकडे पोहोचविला जात असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार, एनसीबीने त्याला चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समजते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केलेल्या तपासात बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले. तेव्हापासून यासंबंधी सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, अनुज केसवानी यांच्यासह एकूण ३५ जणांना अटक झाली. त्यामध्ये बहुतांश जण हे ड्रग्ज तस्कर आहेत.
........................................