Join us

समीर वानखेडेंची लवकरच उचलबांगडी?; साक्षीदाराच्या गंभीर आरोपांची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 13:26 IST

समीर वानखेडे यांची खाते अंतर्गत चौकशी होणार; महासंचालकांनी दिल्लीला बोलावलं

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) टाकलेल्या छाप्यानं चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या वादात सापडले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांच्या दाव्यांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. साईल यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

एनसीबीच्या महासंचालकांनी वानखेडेंना उद्या दिल्लीला बोलावून घेतलं आहे. आढावा बैठकीसाठी वानखेडेंना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. वानखेडेंची चौकशी करण्यात येणार असून त्याची जबाबदारी ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

साईल यांचे वानखेडेंवर गंभीर आरोपकिरण गोसावी यानं एनसीबीच्या कार्यालयाजवळच सॅम डिसोजा नावाच्या व्यक्तीची भेट घेतली होती आणि त्यांच्या व्यवहारासंबंधी बोलणं सुरू होतं. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं आहे. एनसीबीच्या या कारवाईचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांच्या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर प्रभाकर साईल आज एनसीबी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील गुन्हे शाखेत पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं प्रभाकर साईल यांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो