Join us  

NCB ला तंबाखू अन् गांजामधला फरक कळत नाही, जावयावरील कारवाईनंतर मलिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 1:14 PM

एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक करता आला नाही. आपल्या जावयाकडे 200 किलो गांजा नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचं स्पष्ट झालं आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

ठळक मुद्देमलिक यांनी हा घटनाक्रम सांगताना, 12 जानेवारीला रात्री 10 वाजता आपले जावाई, समीर खान यांना ईडीचं समन्स आलं आणि 13 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, एनसीबीला गांजा आणि तंबाखू यातील फरक समजत नाही. त्यातूनच माझ्या जावयाला बदनाम करण्यात आलं असून 8 महिने तुरुंगात राहावे लागल्याचे मलिक यांनी सांगितले. एनसीबी ही नावजलेली तपास यंत्रणा असून तिचा गैरवापर होत असल्याचा आरोपही मलिक यांनी केलाय. 

एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक करता आला नाही. आपल्या जावयाकडे 200 किलो गांजा नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचं स्पष्ट झालं आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. मलिक म्हणाले की, "मुंबईत 8 जानेवारी रोजी एका व्हॉट्सअपवरुन काही माध्यमांना एक मेसेज करण्यात आला होता. आपण एक रेड करुन ड्रग्ज संदर्भात कारवाई करत असल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या माहितीच्या खाली समीर वानखेडे यांचं नाव होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी झाली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली." 

मलिक यांनी हा घटनाक्रम सांगताना, 12 जानेवारीला रात्री 10 वाजता आपले जावाई, समीर खान यांना ईडीचं समन्स आलं आणि 13 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं. याची माहिती माध्यमांना आधीच देण्यात आली होती. बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आल्याचं मलिक यांनी म्हटलंय. त्यामध्ये, आपल्या जावयाला आठ महिने तुरुंगात रहावं लागलं तर मुलीला धक्का सहन करावा लागला असा आरोपही मलिक यांनी केला. 

दरम्यान, नवाब मलिकांनी गेल्या काही दिवसात सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.  

टॅग्स :नवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोगुन्हेगारीतंबाखू बंदी