Join us

एडनच्या आखातात २,५०० किलो ड्रग्ज नाैदलाकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:29 IST

Mumbai: भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने ‘आयएनएस तरकश’ युद्धनौकेच्या माध्यमातून एडनच्या आखाताजवळ २५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. अत्यंत गोपनीय आणि व्यूहरचनात्मक कारवाई करत ही मोहीम नौदलाने फत्ते केली.

 मुंबई  - भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने ‘आयएनएस तरकश’ युद्धनौकेच्या माध्यमातून एडनच्या आखाताजवळ २५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. अत्यंत गोपनीय आणि व्यूहरचनात्मक कारवाई करत ही मोहीम नौदलाने फत्ते केली. मुंबई मुख्यालय असलेल्या नौदलाच्या पश्चिम कमांडच्या अंतर्गत ही युद्ध नौका कार्यरत आहे.

सोमालियन चाचे व दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे एडनच्या आखातात असलेला व्यापार उद्योग संकटात आला होता. यासाठी भारतीय नौदलासह विविध देशाच्या नौदलांनी संयुक्त कृती  दल तयार केले आहे. ३१ मार्च रोजी  गस्तीवर असताना, आयएनएस  तरकशला भारतीय नौदलाच्या पी ८१  विमानाकडून परिसरात कार्यरत असलेल्या संशयास्पद जहाजांबाबत सूचना मिळाल्या. हे जहाज अमली पदार्थांच्या तस्करीसह बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील असल्याचा संशय होता.

जवळपासच्या सर्व संशयास्पद जहाजांची पद्धतशीरपणे चौकशी केल्यानंतर, पी ८१ आणि मुंबईतील सागरी ऑपरेशन केंद्र यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे आयएनएस तरकशने एका संशयित जहाजाला रोखले आणि त्यावर कारवाई केली याशिवाय संशयास्पद जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि या भागात कार्यरत असणाऱ्या इतर जहाजांची तपासणी करण्यासाठी   हेलिकॉप्टर लॉन्च केले. चौकशीमध्ये जहाजावरील वेगवेगळ्या मालवाहू होल्ड आणि कंपार्टमेंटमध्ये साठवलेले २५०० किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ सापडले. 

जलक्षेत्रात सुरक्षा, स्थिरता आणण्याचे उद्दिष्टसमुद्रात अमली पदार्थांची तस्करी करण्यासह बेकायदेशीर कारवायांना मज्जाव आणि अडथळा करण्यासाठी भारतीय नौदलाने अत्यंत प्रभावी अशी ही कारवाई केली आहे.   बहुराष्ट्रीय सरावांमध्ये भारतीय नौदलाच्या सहभागाचे उद्दिष्ट म्हणजे हिंद महासागर क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देणे असल्याचे नौदलाने सांगितले.

टॅग्स :अमली पदार्थभारतीय नौदल