Join us  

आज घटस्थापना :मुंबईत आजपासून रंगणार दांडिया आणि रास गरबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 3:38 AM

पाऊस, खड्डे, युती-आघाडी यांच्या माऱ्यात अडकलेल्या मुंबईकरांना आता वेध लागले आहेत ते आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाचे.

मुंबई : पाऊस, खड्डे, युती-आघाडी यांच्या माऱ्यात अडकलेल्या मुंबईकरांना आता वेध लागले आहेत ते आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाचे. ठिकठिकाणी नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. त्यासाठी नवरात्रौत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. त्याच सोबत दांडिया व रास गरबा आयोजकांची तयारीही पूर्ण झाली आहे.बोरीवली, मालाड, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे, दादर, दगडी चाळ, घाटकोपर येथील छोट्या-मोठ्या मैदानांमध्ये नऊ दिवस गरब्याची धामधूम सुरू राहणार आहे. ‘परी हू मैं’, ‘छो गाडा तारा’, ‘सनेडो सनेडो’, ‘भाय-भाय’, ‘कमरिया’, ‘नगाडा संग ढोल बाजे’, ‘उडी-उडी जाये’, ‘केसरीया रंग तारे लागोनी गरबा’ इत्यादी गाण्यांवर थिरकण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.चांगल्या प्रकारे गरबा खेळता यावा यासाठी गरब्याची शिकवणीही ठेवली जाते. गरबा क्लासेसची वर्दळ एक ते दोन महिन्यांपासून सुरू असते. काही ठिकाणी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ‘सायलेंट गरब्या’चेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवरात्री उत्सवात अनेक मंडळांकडून सामाजिक, पर्यावरणस्नेही संदेश दिले जात आहेत.नवरात्रीसाठी शहर, उपनगरातीलबाजारपेठा सज्जयंदाही पारंपरिक, रबारी, कच्छी भरत या घागरा-चोळींना अधिक मागणी आहे. उत्सवामध्ये मुलींसाठी विशेष घागरा-चोळींनी बाजारपेठा सजल्या आहेत. विशेषत: राजस्थानी घागरा, धोती, कुर्ता याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. कवड्या, कडे, कंबरपट्टा, झुमका, बाहूंना लावायचे तोडे, पायातील वाळे यांसारख्या आकर्षक दागिन्यांनी बाजार फुलला आहे. लहान मुलांचे आकर्षक रंगीबेरंगी छोटेछोटे कपडे लक्ष वेधून घेत आहेत. लाकडी, मेटल, लाइटवाली दांडिया, बांधणी टिपरी, चुनरी दांडिया, डिस्को टिपरी इत्यादी दांडिया बाजारात उपलब्ध आहेत. 

टॅग्स :नवरात्रीमुंबई