Join us  

Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणाने, पण मुंबईकरांचा उत्साह कायम! अनेक व्यवसायांना झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 8:39 AM

मंडळांतर्फे राबविले जाणार सामाजिक उपक्रम

मुंबई : राज्यावर कोरोनाचे सावट अद्यापही कायम असल्याने गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रौत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. 

मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळे व आयोजक दरवर्षी नऊ दिवस गरबा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र यंदा गर्दी जमेल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याचे आदेश शासनाने दिल्याने गरबा व इतर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे न करण्याचा निर्धार  मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांनी केला आहे.  मुंबईत दरवर्षी सुमारे अडीच हजार मंडळे नवरात्रौत्सव साजरा करतात. मात्र यंदा अनेक मंडळांनी नवरात्रौत्सव रद्द केला आहे.  तर काही मंडळांनी केवळ घट बसवून छोट्या स्वरूपात सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील मंडळांनी गर्दी होईल असे कोणतेही उपक्रम न आयोजित करता त्याऐवजी रक्तदान शिबिर, गरजू रुग्णांना साहित्याचे वाटप, कोविड योद्ध्यांचा सन्मान तसेच  नारी शक्तीचा सन्मान असे लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियम व अटींमुळे नवरात्रौत्सवावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे. मूर्तिकार, ढोल-ताशा पथक, ऑर्केस्ट्रा, डेकोरेटर्स, फुल व हारवाले, मिठाईची दुकाने, नवरात्री विशेष कपड्यांची दुकाने तसेच दांडिया विकणारे हे सर्व व्यवसाय नवरात्रौत्सवात दरवर्षी अत्यंत तेजीत असतात.

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकड़ून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नवरात्रौत्सव मंडळांसोबत बैठका घेत त्यांना नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काही मंडळांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमधील नऊ रंग समाजातील प्रत्येक घटकास समर्पित करण्याचे ठरविले आहे. शासनाच्या आदेशानुसार अनेक मंडळांनी जाहिरातींच्या द्वारे आरोग्यविषयक सामाजिक संदेश पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत जनजागृती करण्यास पुढाकारदेखील घेतला आहे.गर्दी होईल असे कोणतेही उपक्रम न आयोजित करता त्याऐवजी रक्तदान शिबिर, गरजू रुग्णांना साहित्याचे वाटप, कोविड योद्ध्यांचा सन्मान तसेच नारी शक्तीचा सन्मान अशा लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर काही मंडळांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमधील नऊ रंग समाजातील प्रत्येक घटकास समर्पित करण्याचे ठरविले आहे.  

टॅग्स :नवरात्री