Join us  

Navneet Rana: महाराष्ट्रात लोकशाही अडचणीत, राणा दाम्पत्यास भाजपाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 2:53 PM

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठाणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांना खार पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली आहे

मुंबई - राज्यात हनुमान चालीसावरुन तापलेलं राजकारण अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले. त्यामुळे, शिवसैनिक आक्रमक झाले असून पोलिसांनी राणा दाम्पत्यास नोटीसही बजावली आहे. आता, भाजपने राणा दाम्पत्याची बाजू घेतली आहे. 

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठाणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांना खार पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असून त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेनाही आक्रमक झाली असून मातोश्रीबाहेर कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यावरुन, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.  ''जेव्हा काही लोकप्रतिनिधी हे सरकारच्या कृतीविरोधात आंदोलन करतात. तेव्हा, सरकारच्या प्रमुखाची, प्रतिनिधींची जबाबदारी आहे की, त्यांच्या चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मु्ख्यमंत्री होते तेव्हा, आंदोलन किंवा मोर्चा असल्यास ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधीही या मोर्चाला मोर्चाच्या माध्यमातून उत्तर द्या असं कधीही सांगत नव्हते. ते आंदोलकांशी चर्चा करुन आंदोलन स्थगित करायची विनंती करायचे. आज एखाद्यानं आंदोलनाची घोषणा केली तर आम्हीही तुमच्याविरुद्ध आंदोलन करतो. ही एक दडपशाहीच्या मार्गातून लोकशाही आम्ही पाहतोय, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. 

महाराष्ट्रात लोकशाही अडचणीत

राणा दाम्पत्याने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सरकारने त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, संवाद साधायला हवा होता. दोन राजकीय पक्षांमध्ये विचारधारेच्या मतभेदाचा फरक असला तरी प्रशासनाच्या माध्यमातून संवाद व्हायला हवा. राज्यकर्ते सुडाच्या भावनेनं वागतात, संवाद संपतो तेव्हा लोकशाही संकटात येते, अडचणीत येते आणि महाराष्ट्रात आज लोकशाही अडचणीत असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :मुंबईनवनीत कौर राणासुधीर मुनगंटीवारभाजपा