नवी मुंबईच्या परिवहन सभापतींची खुर्ची अस्थिर

By Admin | Updated: March 25, 2015 01:10 IST2015-03-25T01:10:19+5:302015-03-25T01:10:19+5:30

शहरवासीयांना चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने परिवहन सेवा (एमएमएमटी) सुरू केली आहे. परंतु या समितीवरील सभापतपदाची खुर्ची नेहमीच अस्थिर राहिली आहे.

Navi Mumbai's transport chairmanship is unstable | नवी मुंबईच्या परिवहन सभापतींची खुर्ची अस्थिर

नवी मुंबईच्या परिवहन सभापतींची खुर्ची अस्थिर

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
शहरवासीयांना चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने परिवहन सेवा (एमएमएमटी) सुरू केली आहे. परंतु या समितीवरील सभापतपदाची खुर्ची नेहमीच अस्थिर राहिली आहे. २० वर्षांत तब्बल ३० जणांची सभापतिपदावर वर्णी लागली असून, वारंवार होणाऱ्या खांदेपालटामुळे कोणालाही कामाचा ठसा उमटविता येत नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नव्हती. बीएमटीसी बंद झाली होती. बेस्ट व एसटी बसेसवर नागरिकांना अवलंबून राहावे लागत होते. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने परिवहन सेवा सुरू केली. कारभार पाहण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांच्या प्रमाणात सदस्यांची नियुक्ती केली जाते. गणेश नाईक यांचे स्थापनेपासून वर्चस्व असल्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सभापतिपदी नियुक्ती केली जाते. परंतु सुरवातीपासून सभापतिपदाकडे राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन या भूमिकेतून पाहिले जात आहे. यामुळे वारंवार सभापतिपद बदलण्यात येत आहे. सुरवातीला एक वर्षासाठी नियुक्ती केली जात होती. यामधील ३ ते ४ महिने सभापतींना कामकाज समजावून घेण्यास जात होते. काम करण्यास सुरवात करेपर्यंत त्यांची बदली करण्यात येते. काही सभापतींना तर एक वर्षाचा कार्यकाळही मिळालेला नाही. सर्जेराव यादव यांना अडीच महिनेच पदावर ठेवण्यात आले होते. २०११ पासून एकाही सदस्याने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. हनुमंत दळवी व दिलीप म्हात्रे यांना प्रत्येकी ८ महिने, रामचंद्र सूर्यवंशी यांना फक्त ४ महिने या पदावर ठेवण्यात आले.
परिवहन सभापतिपदावर जुलै २०१३ मध्ये अन्वर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज करण्यास सुरवात केली. प्रशासनास शिस्त लावण्यास सुरवात केली होती. स्वत:चा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचीही सहा महिन्यांमध्ये उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्यानंतर आलेल्या मुकेश गायकवाड व गणेश म्हात्रे यांना ७ महिन्यांत पदावरून जावे लागले असून आता रामनाथ भोईर यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांना किती दिवसात बदलणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. परिवहनचा तोटा वाढत चालला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण होत नाही. आतापर्यंत सुरेश कुलकर्णी व चंद्रकांत आंगोंडे या दोघांना दोन वेळा या पदावर नियुक्त केले आहे. गजानन कोंडे यांचीही दोन वेळा नियुक्ती केली.

जुलै १९९५ पासून एनएमएमटीचे सभापती
अशोक पोहेकर, विनायक म्हात्रे, सुरेश म्हात्रे
भरत नखाते, जगन्नाथ कोळी, सर्जेराव यादव
यशवंत चोगले, नारायण म्हात्रे, गजानन कोंडे (२ वेळा)
शेलाजी केसरकर, रामचंद्र ठाकूर, इकबाल कवारे
सुरेश कुलकर्णी (२ वेळा), भालचंद्र नलावडे, धोंडू म्हात्रे
फकिर पटेल, विश्वनाथ पाटील, सशी दामोदरन
उमाकांत नामवाड, चंद्रकांत आगोंडे (२ वेळा)
हनुमंत दळवी, दिलीप म्हात्रे, रामचंद्र सूर्यवंशी
अन्वर शेख, मुकेश गायकवाड, गणेश म्हात्रे, रामनाथ भोईर

Web Title: Navi Mumbai's transport chairmanship is unstable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.