नवी मुंबईचा शैक्षणिक विकास झपाट्याने
By Admin | Updated: October 6, 2015 00:46 IST2015-10-06T00:46:06+5:302015-10-06T00:46:06+5:30
२१व्या शतकात झपाट्याने वाढणारे आणि सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई शहराला ओळखले जात असले तरी शैक्षणिक हब म्हणून शहराची नवी ओळख निर्माण होत आहे.

नवी मुंबईचा शैक्षणिक विकास झपाट्याने
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
२१व्या शतकात झपाट्याने वाढणारे आणि सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई शहराला ओळखले जात असले तरी शैक्षणिक हब म्हणून शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. शैक्षणिक विकासानेही गती धरली असून मॅनेजमेंट कोर्स, अभियांत्रिकी, पदवी अभ्यासक्रम या प्रत्येक क्षेत्रात करिअरसाठी खुली वाट नवी मुंबईकरांना उपलब्ध आहे.
नवी मुंबईचा वाढता विकास पाहता या शहराला एज्युकेशन हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. आधुनिकता, नवी तंत्रज्ञान शैली, स्मार्ट सिटी, हॉस्पिटॅलिटी या प्रत्येक अनुषंगाने शहराला सायबर सिटीची ओळख प्राप्त झाली आहे. या सायबर सिटीमध्ये शिक्षण घेताना तरुणांसाठी अनेक वाटा खुल्या आहेत.
मुंबई-पुणे महामार्ग, पाम बीच रोड, रेल्वे सुविधा या ठिकाणी असलेले आयटी पार्क यामुळे शहराची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये २,५०० हून अधिक उद्योगधंदे असून यामधून करोडोची उलाढाल होते. भविष्यात या शहरातील तरुणांना रोजगारासाठी इतरत्र न भटकता याठिकाणी उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षणही उपलब्ध असल्याने परदेशातून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी चांगला पर्याय उपलब्ध आहे. शहराचा विकासाचा आलेख पाहता या ठिकाणी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
नवी मुंबईत १३ इंजिनियरिंग कॉलेज, ५१ इतर महाविद्यालये आहेत. सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शैक्षणिक प्रगतीवर भर दिला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनाही या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता येईल अशा अनेक शाळा, महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांना एक चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले वातावरणही या ठिकाणी मिळत असल्याने शैक्षणिक प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर इतर कला, क्रीडा जोपासण्याची मुभा मिळत असल्याने नवी मुंबईतील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात नाव गाजवित असल्याचे पहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरसाठी शिक्षण हाच महत्त्वाचा पाया असल्याने नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीतील विद्यार्थी देखील स्मार्ट बनविण्यासाठी अनेक शाळांत उपक्रम राबविले जातात.
एज्युकेशन हब असलेल्या या नवी मुंबई शहरात महापे येथील मिलेनियम पार्क, द्रोणागिरी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी हार्डवेअर पार्क, ऐरोली नॉलेज पार्क, आयटीसी पार्क सीबीडी, आंतरराष्ट्रीय आयटी पार्क अशा आधुनिक आयटी पार्कचा समावेश आहे.
प्रत्येक क्षेत्रात करिअरच्या वाटा....
आयटी आणि सॉफ्टवेअर
सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंट, वेब डिझायनिंग, प्रोग्रामिंग, सॉफ्ट कोर व हार्ड कोर मार्केटिंग अशा विविध संधी उपलब्ध आहेत.
पत्रकारिता
अनेक मराठी/हिंदी/इंग्रजी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे, मासिके यांची कार्यालये असल्याने या क्षेत्रात पाऊल टाकू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
मेडिकल
शहरात मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेची तसेच खाजगी रुग्णालये असल्याने या क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.
इतर
आयटीआय, डिप्लोमा, मॅनेजमेंट कोर्स या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. शिक्षक म्हणून करिअर करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालये उपलब्ध असून या ठिकाणी शिकविण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच खाजगी क्लासेसमध्येही विद्यार्थ्यांना शिकविण्याची संधी मिळू शकते.