नवी मुंबईतील घोटाळ्यांची चौकशी करणार
By Admin | Updated: April 20, 2015 01:10 IST2015-04-20T01:10:17+5:302015-04-20T01:10:17+5:30
भ्रष्टाचाराला नवी मुंबईतील जनता कंटाळली आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व घोटाळ््यांची चौकशी आम्ही करू. हे भ्रष्टाचार टाळण्यासाठी येत्या २२ एप्रिल

नवी मुंबईतील घोटाळ्यांची चौकशी करणार
नवी मुंबई : ‘भ्रष्टाचाराला नवी मुंबईतील जनता कंटाळली आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व घोटाळ््यांची चौकशी आम्ही करू. हे भ्रष्टाचार टाळण्यासाठी येत्या २२ एप्रिल रोजी शिवसेना-भाजपाच्या उमदेवारांना मत द्या,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानावर रविवारी संध्याकाळी ८ वाजता युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्यावर कडाडून टीका केली. ‘सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका विकली आहे. गेली २० वर्षे महापालिकेचा कारभार नाईकांच्या व्हाईट हाऊसमधून चालत होता. मात्र, युतीची सत्ता आल्यावर तो पालिका सभागृहातून चालेल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून युती सरकारने सेवा कायदा आणला. त्याअंतर्गत प्रत्येक कामाची डेडलाइन ठरवून अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच कार्यवाहीसाठी सेवा आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. शिक्षण संस्थांतील बाजार रोखण्यासाठीही कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. टॅक्स वाढवणार नाही, या गणेश नाईकांच्या घोषणेचाही त्यांनी समाचार घेतला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नवी मुंबईत एक लाख रोजगाराची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीसह नाईक कुटुंबाच्या मनमानीवर टीका केली. स्थानिक आमदार मंदा म्हात्रेंनी गरजेपोटीची घरे नियमित करण्याच्या मागणीसह शहरातील जमीन फ्री होल्ड करण्याची मागणी केली. तसेच गणेश नाईकांवर टीका करताना कळवा-बेलापूर बँक कोणी बुडविली, काळू बंधारा कुणी बांधला असे प्रश्न केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार हरिबंश सिंह, राजन विचारे, आमदार नीलम गोऱ्हे, संजय केळकर, प्रशांत ठाकूर, राम कदम, उपनेते विजय नाहटा, सुरेश हावरे आणि आ. अतुल भातखळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)