नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षेची दिवाळी भेट
By Admin | Updated: November 12, 2015 01:30 IST2015-11-12T01:30:06+5:302015-11-12T01:30:06+5:30
संकटकाळी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी पोलिसांनी मोबाइल अॅप्लीकेशन तयार केले आहे. सिटीझन कॉप नावाचे हे स्मार्ट अॅप्लीकेशन सुरक्षेच्या बाबतीत महिला

नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षेची दिवाळी भेट
नवी मुंबई : संकटकाळी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी पोलिसांनी मोबाइल अॅप्लीकेशन तयार केले आहे. सिटीझन कॉप नावाचे हे स्मार्ट अॅप्लीकेशन सुरक्षेच्या बाबतीत महिला, मुलांसह प्रत्येक नागरिकाला उपयुक्त ठरणार आहे.
सध्या प्रत्येक जण स्मार्ट फोनचा वापर करत असून त्यांच्या गरजाही तितक्याच स्मार्ट झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी देखील स्मार्ट पध्दतीने घेण्याचा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. याकरिता सिटीझन कॉप नावाचे मोबाइल अॅप्लीकेशन तयार करून ते अँड्रॉईड मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणारा प्रत्येक जण या अॅप्लीकेशनचा वापर करू शकणार आहे. सध्या अनेक जण प्रत्यक्ष पाहिलेल्या दुर्घटनेची अथवा गैरप्रकाराची छायाचित्रे काढून सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी सिटीझन कॉपवर हेच फोटो पाठवल्यास पोलिसांना अर्ध्या मिनिटात त्या घटनेची माहिती कळून संबंधिताला मदत मिळू शकणार आहे. त्यामुळे बहुउपयोगी असलेले हे मोबाइल अॅप्लीकेशन नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना मिळालेली सुरक्षेची दिवाळी भेट ठरणार आहे. त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. काही महिन्यांपासून पोलिसांचे हे अॅप्लीकेशन तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. तत्कालीन गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार सोमवारी या अॅप्लीकेशनच्या उद्घाटनप्रसंगी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत, विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे उपस्थित होते.