जांभळी नाका वाहतूकीत नवरात्रौत्सवात बदल
By Admin | Updated: September 23, 2014 23:45 IST2014-09-23T23:45:41+5:302014-09-23T23:45:41+5:30
शहरातील जांभळी नाक्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जांभळी नाका वाहतूकीत नवरात्रौत्सवात बदल
ठाणे : शहरातील जांभळी नाक्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. चिंतामणी चौकातील मार्ग हा ठाणे रेल्वे स्थानक ते थेट टेंभी नाका असा करण्यात आला आहे. या मार्गावरुन चिंतामणी चौकातून यू टर्न घेण्यास बंदी करण्यात आली आहे.
ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखेने गेल्या काही दिवसांपासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच गावदेवी येथील वाहतुक मार्गात बदल केला आहे. त्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाल्याने वाहनचालकांसह रिक्षा चालकांनीही या बदलाचे स्वागत केले. मात्र, आता अचानक जांभळी नाक्यावरील वाहतुक चिंतामणी चौक येथून पुन्हा रेल्वे स्थानकाकडे जाण्याला बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी ती टेंभी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून पुन्हा चिंतामणी चौक किंवा गणेश मंदीरापासून जांभळी नाक्यावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे शून्य मिनिटांच्या अंतरासाठी १५ मिनिटांचा कालावधी याठिकाणी लागू लागला आहे.
या बदलामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी असली तरी हा बदल नवरात्रौत्सवासाठी तात्पुरता करण्यात आल्याची माहिती शहर वाहतुक नियंत्रण शाखेने दिली आहे. (प्रतिनिधी)