खारघरमधील कुंभार बावडीला मिळणार नवसंजीवनी
By Admin | Updated: May 20, 2015 22:38 IST2015-05-20T22:38:31+5:302015-05-20T22:38:31+5:30
खारघरमधील सर्वात जुन्या कुंभार बावडीला नवसंजीवनी मिळणार असून या बावडीची साफसफाई करून बावडीचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

खारघरमधील कुंभार बावडीला मिळणार नवसंजीवनी
वैभव गायकर ल्ल पनवेल
खारघरमधील सर्वात जुन्या कुंभार बावडीला नवसंजीवनी मिळणार असून या बावडीची साफसफाई करून बावडीचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने सिडकोच्या मदतीने पुढाकार घेतला आहे .
खारघर सेक्टर-१२ मधील शनि मंदिराजवळ ही बावडी आहे. दीडशे वर्षांपूर्वी खारघर परिसरात कोपरा, खारघर, बेलपाडा, मुर्बी आदी गावांतील शेतकरी आपल्या जमिनी कसत होते. यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणचे शेतकरी आपल्या गुरांना घेऊन याठिकाणी येत होते. प्राण्यांसह, चार गावांतील रहिवाशांची तहान भागवणारी बावडी अशी या कुंभार बावडीची ओळख होती. कालांतराने सिडकोने नवी मुंबई प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या, त्यामध्ये खारघरचा देखील समावेश असल्याने भरावामध्ये ही बावडी गाडली गेली. मात्र नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या या बावडीला नवसंजीवनी देण्याचे काम खारघरचा राजा ट्रस्टने केले आहे. ६० ते ७० फूट खोली असलेल्या या बावडीतून आत्तापर्यंत १२ ते १५ टन गाळ, माती, दगड बाहेर काढून बावडीला स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही बावडी स्वच्छ होईल व खारघरवासीयांना या बावडीतून पाणीपुरवठा केला जाईल, अशी आशा खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केली.
खारघरसारख्या शहरामध्ये शहरामधील जुन्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा वापर केल्यास पाणीटंचाई कधीही भासणार नाही. जलयुक्त शिवार योजना ग्रामीण भागाप्रमाणे शहरामध्ये राबविल्यास फायदा होईल.
अशा जुन्या बावडीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा केला, सिडकोने देखील मदत केली आहे. या बावडीचे काम पूर्ण झाल्यास खारघरमधील सर्वात मोठ्या सेक्टर-१२ सह अर्ध्या खारघरचा पाणी प्रश्न सुटेल. शहरामधील इतर बावडी, तलावांचे याच धर्तीवर संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
- विजय पाटील, अध्यक्ष, खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट