नौदल दिन; गौरव स्तंभाला सुवर्ण मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 03:06 IST2020-12-05T03:06:26+5:302020-12-05T03:06:43+5:30
मुंबईतील नौदलाच्या गोदीत शानदार ‘गौरव स्तंभ’ उभारण्यात आला आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने या स्तंभाचे अनावरण करतानाच नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखांनी आज स्तंभाला मानवंदना दिली.

नौदल दिन; गौरव स्तंभाला सुवर्ण मानवंदना
मुंबई : देशाचे सागरी प्रभुत्व स्थापित करणाऱ्या तसेच १९७१ सालच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची शुक्रवारी नौदल दिनी सुरुवात झाली. याचे औचित्य साधत नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजित कुमार यांनी ‘गौरव स्तंभ’ या विजय शिल्पाचे औपचारिक अनावरण केले.
मुंबईतील नौदलाच्या गोदीत शानदार ‘गौरव स्तंभ’ उभारण्यात आला आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने या स्तंभाचे अनावरण करतानाच नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखांनी आज स्तंभाला मानवंदना दिली. नौदलाच्या पश्चिम विभागातील जवानांनी शौर्य, पराक्रम आणि कठीण परिस्थितीतही दाखविलेल्या साहसाचे प्रतीक म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला आहे. आजवरच्या सागरी विजयाचेही ते प्रतीक आहे. नौदलाच्या पाणबुडीतील खलाशी, नाविक तळांवरील जवान आणि नौदल वैमानिक अशा नौदलाच्या तिन्ही अंगांचे या स्तंभात प्रदर्शन करण्यात आले आहे. योद्धयाचे गुणवर्णन करणारा भगवद् गीतेच्या १८ व्या अध्यायातील ‘शौर्य तेजो धैर्य’ हा ४३ वा श्लोकही या गौरव स्तंभावर अंकित करण्यात आला आहे.