निसर्ग संपदेची लुटमार

By Admin | Updated: February 8, 2015 22:39 IST2015-02-08T22:39:36+5:302015-02-08T22:39:36+5:30

एकीकडे कर्जत तालुका निसर्ग सौंदर्याच्या कुशीत लपला असताना दुसरीकडे निसर्ग सौंदर्यामुळे तालुक्यात फार्म हाऊस संस्कृती उदयास येत आहे

Nature raiders | निसर्ग संपदेची लुटमार

निसर्ग संपदेची लुटमार

नेरळ : एकीकडे कर्जत तालुका निसर्ग सौंदर्याच्या कुशीत लपला असताना दुसरीकडे निसर्ग सौंदर्यामुळे तालुक्यात फार्म हाऊस संस्कृती उदयास येत आहे, तर दुसरीकडे विकासकांनी सुरू ठेवलेल्या बेकायदा माती उत्खननामुळे कर्जतमधील टेकड्या नामशेष, ओसाड होत आहेत. या निसर्ग संपदेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. या गंभीर समस्येकडे वनविभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
कर्जतमधील पाली - भूतीवली धरणाच्या बांधकामासाठी वडवली येथील डोंगर-टेकड्यांच्या ठेकेदारांनी बेकायदा माती उत्खनन करून निसर्ग संपदेचा ऱ्हास केला आहे. कर्जत - कल्याण चौपदरीकरणासाठी माणगाव गावाजवळील टेकड्यांवरही ठेकेदारांनी बेकायदा माती उत्खनन केल्याचा कथित आरोप येथील नागरिक करीत आहेत. तसेच नेरळजवळील चोरावले येथील डोंगर टेकड्यावरही विकासकांनी अवैध दगड - माती उत्खनन केल्याने टेकड्या नामशेष झाल्या आहेत. अशाप्रकारे तालुक्यात अनेक ठिकाणी टेकड्यांवर बेकायदा माती उत्खनन सुरू असल्याने निसर्ग संपदेची लुटमार करणाऱ्या विकासकांवर आजतागायत वनविभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.
कर्जत तालुका तिसरी मुंबई म्हणून उदयास येत असल्याने कर्जत शहर तसेच तालुक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अन्य मोठ्या शहरातील नागरिकांनी वास्तव्यासाठी कर्जतला पसंती दिली आहे. जमिनीचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. याचा परिणाम म्हणून शहरातील बिल्डर आता गावाकडच्या जागांकडे वळले आहेत. त्यामुळे गावाकडचे डोंगरही उजाड दिसू लागले आहेत.
शहरी भागातील जागा संपल्याने विकासकांनी बांधकाम व्यवसायासाठी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टेकड्यांवर बेकायदा माती उत्खनन विकासकांकडून होत असल्याने निसर्ग संपदेचा ऱ्हास होत आहे. कर्जत तालुक्यातील पर्यावरणाचा ऱ्हास असाच सुरू राहिला, तर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन परिसरात रोगराई पसरेल, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याशिवाय पर्जन्यमानावरही त्याचा गंभीर परिणाम व इतर समस्या उद्भवण्याच्या शक्यता असल्याने संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nature raiders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.