राष्ट्रवादीचे खायचे व दाखवायचे दात वेगळे
By Admin | Updated: September 17, 2014 23:06 IST2014-09-17T22:31:56+5:302014-09-17T23:06:32+5:30
मदन पाटील : आजवरचा अनुभव वाईट

राष्ट्रवादीचे खायचे व दाखवायचे दात वेगळे
सांगली : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आमच्यासोबत गृहीत धरणार नाही. यापूर्वीच्या निवडणुकांमधील त्यांचा अनुभव वाईट आहे. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, लोकसभा व यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमधील राष्ट्रवादीचा अनुभव चांगला नाही. व्यासपीठावर येऊन घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात वेगळीच भूमिका घ्यायची, असा प्रकार अनुभवला आहे. त्यामुळे त्यांना गृहीत धरून कोणतेही राजकीय गणित आम्ही आखणार नाही. सोबत आले तर ठीक नाही तर आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा नाही. गत विधानसभा निवडणुकीत आमचे नेमके काय चुकले, हे कळाले नाही. तरीही लोकांच्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांची पूर्तता करणे गरजेचे असते. गेल्या पाच वर्षात सांगली शहरात काहीही झाले नाही. महाआघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी योजना आखल्या, पण त्यांना त्यात यश आले नाही. शहराचा विकास म्हणावा तसा झाला नाही. आता महापालिकेच्या माध्यमातून काम करताना अडचणी येत आहेत.
यंदाच्या निवडणुकीत विरोधकांकडून विकासाच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार आहे. तरीही जनता अशा गोष्टींना भूलणार नाही.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होती, हे मान्यच करावे लागेल. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र शासनाकडून जनतेचा अपेक्षाभंग होत आहे. भाजपचा कोणताही उमेदवार रिंगणात असला, तरी त्याने कॉँग्रेसला काही फरक पडणार नाही. (प्रतिनिधी)
दादा घराण्यात वाद नाही
वसंतदादा घराण्यात वाद असल्याची चुकीची चर्चा केली जात आहे. वास्तविक आमच्यात कोणतेही वाद नाहीत. आम्ही सर्व एकत्रच आहोत, असे मदन पाटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच वर्षात सांगली शहरात काहीही विकास कामे झाली नाहीत. महाआघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी योजना आखल्या, पण त्यांना त्यात यश आले नाही. शहराचा विकास म्हणावा तसा झाला नाही. आता महापालिकेच्या माध्यमातून काम करताना अडचणी येत असल्याची टीकाही मदन पाटील यांनी केली.